Hingoli News: हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठी कारवाई केली आहे. वसमत तालुक्यातील सिरळी शिवारात लसणाच्या पिकात लपवून केलेल्या अफूच्या बेकायदेशीर लागवडीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १ क्विंटल ७७ किलो अफूच्या झाडांसह एकूण ३ लाख ५४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना, त्यांना सिरळी शिवारात अफूची बेकायदेशीर लागवड झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पो.नि. मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शिवसांब घेवारे यांच्या पथकाने संबंधित शेतात छापा टाकला. तपासणी दरम्यान, शेतमालक प्रताप सुरेश नलगे (वय ४२) याने आपल्या ४ गुंठे शेतात लसणाच्या पिकाच्या आडोशाने अफूची लागवड केल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही झाडे जप्त केली असून, राजपत्रित अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत त्याचे वजन केले असता ते १ क्विंटल ७७ किलो ४५ ग्रॅम भरले. गुन्हा दाखल व अटक – विक्रीच्या उद्देशाने ही लागवड केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या मदतीने मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी प्रताप नलगे याच्याविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम ८ (क) आणि १८ नुसार गुन्हा (गु.र.नं. ५६/२०२६) दाखल करून त्याला अटक केली आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम यापुढेही तीव्रपणे सुरू राहील. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पोलिसांनी म्हंटले आहे. दरम्यान जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, आणि पो.नि. मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शिवसांब घेवारे, अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पाकळे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, साईनाथ कंठे, किशोर सावंत तसेच कुरुंदा पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. कारामुंगे, संदीप टाक आणि साठे यांच्या पथकाने पार पाडली.