Hingoli News : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुलांचा अचानक तापाच्या आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ दोन दिवस ताप आल्यानंतर इतक्या कमी कालावधीत मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब मानली जात आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. २५ फेब्रुवारी रोजी नकुल श्रीधर देशमुख (वय १७) याचा तापामुळे मृत्यू झाला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी नैतिक ज्ञानेश्वर गोरे (१६) यालाही साधारण तापाची लक्षणे होती. तो २६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहावीच्या परीक्षेसाठी जाण्याची तयारी करत असताना अचानक चक्कर येऊन घरातच कोसळला. त्याला तातडीने स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी हिंगोली येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, दवाखान्यात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन्ही मुलांना अचानक तापाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. अल्पावधीत झालेल्या या मृत्यूमागे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन किंवा इतर कोणता संसर्गजन्य आजार कारणीभूत आहे का? याबाबत स्पष्टता नसल्याने सखोल वैद्यकीय तपासणीची गरज व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर आरोग्य विभागानेही तत्परता दाखवत पुसेगाव येथे वैद्यकीय पथक पाठविले. पथकाकडून गावात व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. आशा वर्कर यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली. ताप, सर्दी, अंगदुखी आदी लक्षणे असलेल्या काही संशयित नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तसेच काही ठिकाणच्या पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दोन्ही मातांचा हृदयद्रावक आक्रोश तापाच्या आजारानंतर अचानक झालेल्या या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन्ही मातांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हेलावून गेले. विशेष म्हणजे, दोघींच्याही कुशीतले ते एकुलते एक चिरंजीव होते. मातांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हेलावून गेले. आरोग्य विभागाकडून गावात तपासणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास:शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन पायघन, डॉ. वसंतपाटील, डॉ. मुक्ता रोडगे, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. प्रकाश बर्वे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश धामणे, तसेच आरोग्य कर्मचारी माधव होळकर, महात्मे, मस्के, बोरगावकर,रोडगे, सुलभेवार, गोडबोले, गंगावणे, पुरी, कोरडे, डव्हळे,देवकते, पवार व आशा वर्कर,यांनी पाहणी केली. आहे या एका पाठोपाठ झालेल्या मृत्यूच्याघटनेने हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी जिल्हाआरोग्य विभागाने तातडीनेया घटनेची दखल घेऊन पुसेगाव येथे विशेष वैद्यकीयपथक पाठवावे, अशी मागणी केली आहे.