हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून यावर्षी रविवारी (ता. 15) रात्री आठला आकाशात 200 ड्रोनद्वारे ‘लेझर शो’ सादर होणार आहे. परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील नागरिकांना हा शो पाहता येणार आहे या लेझर शोचे यावर्षी मोठे आकर्षक असणार आहे औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीला रात्री ओठला भक्तनिवास, पार्किंग परिसरात लेझर शो होणार असून यामध्ये तब्बल 200 ड्रोनचा वापर केला जाणार आहे. यामध्ये मंदिराची प्रतिकृती, नागनाथांची पिंड, शंकर- पार्वती यांची मूर्ती तयार केली जाणार असून मंदिराचे महत्त्व, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा केलेला जीर्णोद्धार आदी माहिती दिली जाणार आहे. जमिनीपासून सुमारे 150मीटर उंच आकाशात हा लेझर शो सादर केला जाणार आहे. परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरून हा शो पाहता येईल. वीस ते तीस मिनिटांच्या शोसाठी व्हीआयपी स्टेज तयार करण्यात आले आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, तहसीलदार हरिष गाडे यांनी संस्थान परिसरात पाहणी करून आवश्यक सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार मंदिर परिसरातील कामे पूर्णत्वाला आली आहेत. दरम्यान, महाशिवरात्री निमित्त शनिवारी ता. 14 मध्यरात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे, मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरिहर भोपी, वैजनाथ पवार, सुरेंद्र डळफ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर रविवारी ता. 15 पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या पश्चिम द्वारातून प्रवेश दिला जाणार आहे त्या ठिकाणावरून दर्शनासाठी सुमारे तीन तासांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे याशिवाय भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी अभिषेक पूजा बंद केली जाणार आहे नागनाथ महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 25 क्विंटल खिचडीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे त्यानंतर रात्री सात वाजता नागनाथाची पालखी काढली जाणार आहे शहरातील रावळेश्वरांच्या मंदिरातून पालखी परत नागनाथ मंदिरात येणार आहे मंदिर परिसरात 100 सीसीटीव्ही चा वॉच औंढा नागनाथ येथील यात्रेनिमित्त दोन लाखापेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने दोन ठिकाणी पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय परिसरात 100 सीसीटीव्ही बसवले आहेत त्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे