Shivraj Singh Chouhan : “काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट, मोदी विरोधामुळे विचारशक्ती हरवली” – शिवराजसिंह चौहान
काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झाली असून, मोदीविरोधाच्या राजकारणामुळे पक्ष राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत आहे. काँग्रेस वापरत असलेली भाषा त्यांच्या पतनाला कारणीभूत ठरेल, असा टोला त्यांनी लगावला.

Shivraj Singh Chouhan – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधापायी काँग्रेसने विचार करण्याची, समजून घेण्याची आणि ऐकण्याची क्षमताच गमावली आहे, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी केली. काँग्रेसचे सध्याचे वर्तन आणि भाषा त्यांच्या राजकीय अधोगतीचे द्योतक आहे.
काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झाली असून, मोदीविरोधाच्या राजकारणामुळे पक्ष राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत आहे. काँग्रेस वापरत असलेली भाषा त्यांच्या पतनाला कारणीभूत ठरेल, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेससह विरोधी पक्षांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतील कथित अनियमिततांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
या मागण्यांसाठी ‘इंडिया’ आघाडीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली आयोजित केली आहे. मात्र, दिवाळीच्या व्यस्त हंगामात व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत व्यापाऱ्यांनी ही रॅली १० नोव्हेंबरनंतर घेण्याची विनंती काँग्रेसला केली आहे.
या मुद्द्यावरून चौहान यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दिवाळीत व्यापारी आणि व्यावसायिकांना ग्राहकांना सेवा देऊन व्यवसाय सुरळीत ठेवायचा आहे. मात्र, काँग्रेस आपल्या राजकीय अजेंड्यासाठी सणाच्या काळात अडथळे निर्माण करण्यावर ठाम असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसला देश, नागरिक किंवा अर्थव्यवस्थेच्या हिताची चिंता नसून, पक्षाला केवळ स्वतःचे राजकीय हित महत्त्वाचे वाटते, असे चौहान म्हणाले. व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून रॅलीची तारीख बदलण्याऐवजी काँग्रेस आंदोलनावर ठाम असल्याची टीकाही त्यांनी केली.






