Ramdas Athawale : कोणाच्या बापावर बोलून सरकार बदलत नाही; आठवलेंचा मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर पलटवार
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या टिप्पणीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

Ramdas Athawale : कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या टिप्पणीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलने करून किंवा कोणाच्या बापावर बोलून देशातील सरकार बदलता येत नाही. बांगलादेशात जे घडले ते भारतात घडणे शक्य नाही.
भारतात फक्त लोकशाही मार्गाने आणि निवडणुकीतील जनमताद्वारेच सत्ता बदलू शकते, असा टोला आठवले (Ramdas Athawale) यांनी सोमवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत लगावला. पटना येथील एका कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमधून आलेल्या एका कमेंटला उत्तर देताना खर्गे यांनी मोदींचा बापही जाईल असे वादग्रस्त विधान केले होते. जनता ठरवते की सत्तेवर कोणी यायचे.
विरोधकांना २०२९ मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जाऊन सत्ता मिळवण्याचा अधिकार आहे, परंतु कोणाच्या बापावर बोलून सत्ता मिळवता येत नाही, असे आठवले म्हणाले.
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेवर बोलताना आठवले म्हणाले की, कोणावरही अन्याय होऊ नये ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. जर एखाद्या नागरिकाचे नाव स्थलांतर किंवा अन्य कारणाने मतदार यादीतून गहाळ झाले असेल, तर त्याला आधार कार्ड दाखवून मतदान करण्याची परवानगी देता येईल का? नवा विचार करून निवडणूक आयोगाने या विषयावर गांभीर्याने विचार करायला हवा, जेणेकरून कोणत्याही नागरिकाचा मतदानाचा अधिकार हिरावला जाणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे या देशात फक्त बहुमताच्या प्रक्रियेतूनच बदल घडू शकतो. आगामी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा दणदणीत विजय मिळवेल, असा विश्वास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला.






