पुणे जिल्हा | गावडेवाडी शाळेचा शिवनेरी किल्ला तालुक्यात दुसरा

मंचर, (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागतिक वारसा नामांकनासाठी आयोजित शालेय गड-किल्ले बनविणे स्पर्धेत गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या प्रतिकृतीने सर्वांचे मन जिंकले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनासाठी पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांच्या प्रचारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत शाळेने यश संपादन केले आहे. विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
नाणी नोटा प्रदर्शनाअंतर्गत विविध जुनी नाणी, नोटा यांचा संग्रह करणे व शिवकालीन नाणी, नोटा, यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन त्या ठिकाणी परिसर स्वच्छता, वृक्षारोपण करण्यात आले.
लाठी- काठी, दांडपट्टा तलवारबाजीविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लाठी- काठी प्रशिक्षण घेऊन विविध प्रात्यक्षिके सादर केली. या यशस्वीतेबद्दल जिल्हाधिकारी यांच्यावतीने ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
नुकतेच गावडेवाडी शाळेला ‘मुख्यमंत्री, माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांकाचे ३ लाखाची बक्षीस जाहीर झाले असून गड किल्ले स्पर्धेत शाळेचा दुसरा क्रमांक आलेला आहे.
शाळेच्या या यशामुळे संपूर्ण गावडेवाडीला अभिमान वाटत आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या यशस्वीतेबद्दल गावच्या वतीने सरपंच विजय गावडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गावडे, जालिंदर गावडे, मनोज तळेकर, अतुल गावडे, पूनम गावडे यांनी अभिनंदन केले.





