Maharashtra Budget 2026 : गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव निधी द्या! सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Budget 2026 : जुन्नरला पर्यटनाचा दर्जा मिळूनही निधीची प्रतीक्षा; आगामी राज्य अर्थसंकल्पात १०० कोटींच्या तरतुदीसाठी पाठपुरावा.

Maharashtra Budget 2026 – केंद्रीय अर्थसंकल्पात प्राचीन वारसा संवर्धन, गिर्यारोहण आणि साहसी संस्कृतीला चालना देण्यासाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक यांसह अन्य राज्यांचा समावेश करण्यात आला, मात्र महाराष्ट्राला यातून वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी मार्च महिन्यात सादर होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात वारसा संवर्धन आणि साहसी संस्कृतीसाठी भरीव तरतूद करावी,
अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.संस्थेचे अध्यक्ष राहुल जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने पर्यटनासाठी केलेल्या तरतुदींचे आम्ही स्वागत करतो, परंतु जैवविविधतेने नटलेला पश्चिम घाट आणि शिवछत्रपतींच्या गड-किल्ल्यांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला स्थान मिळायला हवे होते.
आता राज्य सरकारने तरी ही उणीव भरून काढावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्राद्वारे साकडे घालण्यात आले आहे. यामध्ये दुर्गम भागाचा शाश्वत विकास आणि नवीन पदभ्रमण मार्ग तयार करण्यावर भर देण्याची विनंती केली आहे.
‘जुन्नर’ साठी १०० कोटींची विशेष तरतूद व्हावी
राज्य सरकारने २०१४ मध्ये जुन्नर तालुक्याला विशेष पर्यटनाचा दर्जा दिला असूनही अद्याप निधी मिळालेला नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन विकासाचा जो आराखडा तयार केला जात आहे, त्याला मंजुरी देऊन येत्या अर्थसंकल्पात जुन्नरसाठी किमान १०० कोटींची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी संस्थेने केली आहे.
डिजिटल शिवनेरी गाईडचे शिवजयंतीला उद्घाटन व्हावे
जुन्नर वन विभागाने लोकसहभागातून राबवलेल्या हरित शिवनेरी अभियानाला गती देण्यासाठी आणि डिजिटल गाईड यंत्रणेचे लोकार्पण येत्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात यावे, यासाठी सह्याद्री गिरिभ्रमण संस्था पाठपुरावा करत आहे, असे राहुल जोशी यांनी नमूद केले.





