Shiv Jayanti 2026 – छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा यंदा नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन सोहळ्याची उंची वाढवावी, असे आवाहन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले. ते शिवजयंती सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गुरुवार (दि. 19) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मंगळवार दि. 17 ते गुरुवार दि. 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. दि. 17 – महिला बचत गट व खाद्यपदार्थ दालन (तीनही दिवस), शिवनेर महोत्सव बैलगाडा शर्यत (दोन दिवस), कबड्डी स्पर्धा व सायं. 7 वा. ‘द फोक आख्यान’ कार्यक्रम. दि. 18 – सकाळी 11 वा. शिवनेर केसरी कुस्ती स्पर्धा, सायं. 7 वा. ‘ऑल दी बेस्ट’ नाटक, रात्री 11 वा. ‘द अभंग रिपोस्ट’ कार्यक्रम. मध्यरात्री 12 वा. जुन्नर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक (पाच रस्ता) येथे फायर शोद्वारे मानवंदना. दि. 19 – सायं. 4 वा. शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण, सायं. 5 वा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भव्य शोभायात्रा उद्घाटन, सायं. 6 वा. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते महाआरती, सायं. 7. 30 वा. ‘मनोरंजन महाजत्रा’ कार्यक्रम होणार आहेत. किल्ले शिवनेरी शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी व जुन्नर शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ठिकठिकाणी आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात येत असून बसस्थानक परिसर व जुन्नर-आपटाळे रस्त्यावर थ्री-डी देखावे साकारले जात आहेत. शिवरायांना मानवंदना देताना एक तास शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश बंद राहणार असला तरी, शिवजन्म सोहळा सर्वांना अनुभवता यावा यासाठी शहरातील विविध ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवजन्मोत्सवात शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदवी स्वराज्य महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार शरद सोनवणे यांनी केले. तालुक्याच्या विकासासाठी निधीची मागणी शिवजयंती निमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. यामध्ये पारुंडे येथील कुंभमेळ्यासाठी मूलभूत सुविधांसाठी 240 कोटी निधी, शिवनेरी ते श्री क्षेत्र भीमाशंकर मार्ग विकास आराखड्यात समावेश, दार्याघाट आराखड्यास तात्काळ मान्यता, जुन्नर परिसरात 2 बिबट्या निवारा केंद्रे, महालक्ष्मी उंब्रज-ओझर पूल बांधकामासाठी 35 कोटी, आदिवासी भागासाठी रिंग रोडसाठी 500 कोटी, पुणे-नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर तालुक्यातून नेण्याची मागणी या मागण्यांचा समावेश आहे.