Shivendrasinhraje Bhosale: “आरोग्य सेवेत दिरंगाई खपवून घेणार नाही!” शिवेंद्रसिंहराजेंचा अधिकाऱ्यांना इशारा; बैठकीत नक्की काय घडलं?
Shivendrasinhraje Bhosale: जिल्हा परिषदेच्या 'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती' बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा; नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या सूचना.

Shivendrasinhraje Bhosale – नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच आरोग्य विभागाचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. सातारा – जावळीतील आरोग्य समस्यांवर तातडीने उपाययोजना करा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिल्या.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न आणि समस्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी मंगळवारी सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ना. भोसले बोलत होते. सातारा व जावळी तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्या,
आरोग्य सेवा उपलब्धतेतील अडचणी तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या. आरोग्य केंद्रांमधील सेवा, मनुष्यबळ, आवश्यक सुविधा तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी,
असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. आरोग्य सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये आणि सामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य यंत्रणेचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत आ. मनोज घोरपडे, उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य अजित साळुंखे, कामेश कांबळे आदींनी विविध प्रश्न मांडले. बैठकीत मांडण्यात आलेल्या आरोग्यविषयक प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत यावेळी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.





