Satara: गणेश मंडळांच्या मंडप परवानगीचा मार्ग सुकर, ‘माय सातारा’ ॲपवरुनही अर्जाची सुविधा
Satara मंडप परवानगीसाठी मंडळांना सातारा नगरपालिकेच्या www.sataranp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल.

Satara: सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर व हद्दवाढ भागातील गणेश मंडळांना मंडप उभारणीची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सातारा नगरपालिकेने ऑनलाइन अर्जाची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे मंडळांना कार्यालयात प्रत्यक्ष हेलपाटे न मारता घरबसल्या परवानगीसाठी अर्ज करता येणार आहे.
मंडप परवानगीसाठी मंडळांना सातारा नगरपालिकेच्या www.sataranp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल. याशिवाय ‘माय सातारा (My Satara)’ या मोबाइल ॲपच्या माध्यमातूनही अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी संबंधित मंडळाने संकेतस्थळ अथवा ॲपवर नोंदणी करून लॉगिन करावे. त्यानंतर Profile → Dashboard → Right to Service → Mandap NOC Application Form या पर्यायामध्ये जाऊन Add New वर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी व मंडपासाठी ना हरकत प्रमाणपत्राचा अर्ज सादर करावा. गणेशोत्सव काळात मंडप उभारताना शासनाने घालून दिलेले नियम, सुरक्षा उपाययोजना आणि अन्य मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे मंडळांना बंधनकारक आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी मंडळांनी वेळेत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक परवानग्या घेण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या स्वाक्षरीने याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.





