Satara: मुख्याधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाचा प्रस्ताव
Satara शहरातील विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थानांची सुविधा आहे. त्याच धर्तीवर नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीही कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था असावी, असा पालिकेचा प्रस्ताव आहे.

Satara: सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थान उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारी दि. २७ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांना निवासासाठी घरभाडे देण्याची तरतूद असताना आता पालिकेच्या खर्चातून स्वतंत्र निवासस्थान उभारण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
शहरातील विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थानांची सुविधा आहे. त्याच धर्तीवर नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीही कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था असावी, असा पालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र, या निवासस्थानासाठी नेमका किती खर्च अपेक्षित आहे, त्याचे बांधकाम किती क्षेत्रफळात होणार, तसेच त्यामध्ये कोणत्या सुविधा असणार, याचा अद्याप अंतिम आराखडा तयार झालेला नाही. प्रथम या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता घेतली जाणार असून, त्यानंतर निवासस्थानाच्या बांधकामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे.
डीपीआरच्या आधारे अंदाजित खर्च निश्चित करून त्यासाठी पुन्हा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या कामासाठी राज्य नगरोत्थान निधीअंतर्गत स्वतंत्र प्रस्ताव सादर करून निधी मंजूर करून घेण्याचीही तयारी पालिकेने केली आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी पालिकेच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात पालिकेच्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र निवासस्थान उभारण्याची गरज आणि होणारा खर्च यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
विषयपत्रिकेत तीनच विषय
सातारा नगरपालिकेच्या गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर अवघे तीन विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दर महिन्याला सर्वसाधारण सभा घेण्याचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असताना विविध विभागांकडून वेळेत महत्त्वाचे प्रस्ताव प्राप्त न झाल्याने विषयपत्रिका आटोपशीर झाल्याचे चित्र आहे. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे, मुख्याधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थान उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव आणि महादरे तलाव परिसरातील नगरपालिकेच्या जागेवर वन उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव असे तीनच विषय विषयपत्रिकेत आहेत.





