Shivendrasinhraje Bhosale : ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’बाबत मोठी अपडेट; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे प्रशासनाला कडक आदेश
Shivendrasinhraje Bhosale : लातूरच्या शासकीय विश्रामगृहात महत्त्वाची बैठक संपन्न; अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत कामाचा आढावा घेतला.

Shivendrasinhraje Bhosale – लातूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारण्यात येणार आहे. या कामास गती द्यावी. कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करू नये, अशा सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला केल्या.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली लातूरच्या शासकीय विश्रामगृहात नुकत्याच झालेल्या बैठकीस आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, महापालिका आयुक्त मानसी मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीणा, भंते प्रज्ञानंद, नगरसेवक, अधिकारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, या पुतळ्याच्या कामास आधीच विलंब झाला असून. यापुढे दिरंगाई न करता काम तातडीने पूर्ण करा. यासाठी अतिरिक्त निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास त्यासाठी मी पाठपुरावा करेन.
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा देखणी होण्यासाठी चेहर्यावरील भाव, बारकावे आणि संपूर्ण शिल्पाची गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी भंते प्रज्ञानंद यांनी केली. पुतळ्याच्या खालील आधारभूत रचना सध्याच्या आराखड्यानुसार लहान दिसत असून, ती पुतळ्याच्या उंचीला अनुरूप करण्यासाठी जागा वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यांची भेट घेऊन आणि जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.





