Talegaon Dhamdhere – सिद्धार्थ विकास मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती आणि विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ११ एप्रिलपासून सुरू झालेल्या या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, भीमज्योत स्वागत आणि वाचनालय उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला. महोत्सवाची सुरुवात शनिवारी (दि. ११) विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर प्रभावी विचार मांडले. रविवारी (दि. १२) आयोजित व्याख्यानात इतिहास संशोधक प्रा. सुहास नाईक यांनी फुले-आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता स्पष्ट केली. मंगळवारी (दि. १४) पुणे येथून आलेल्या भीमज्योतीचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच दिवशी बाजार मैदानातील बुद्धविहार येथे नवीन वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी आणि वाचनाची गोडी लागावी म्हणून हे वाचनालय सुरू करण्यात आल्याचे माजी उपसरपंच मनोज आल्हाट यांनी सांगितले. या प्रसंगी बाळासाहेब नरके, महेश ढमढेरे, विद्या भुजबळ, नवनाथ कांबळे, सोमनाथ कुदळे, नवनाथ भुजबळ, स्वप्नील खेडे, चेतना ढमढेरे यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी बाजार मैदान येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीत सामाजिक एकतेचे दर्शन घडले असून, सामूहिक वंदना घेऊन या महोत्सवाची सांगता करण्यात आली. संपूर्ण महोत्सवामुळे परिसरात चैतन्यमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.