Shivendraraje Bhosale: रस्ते, पूल अन् मायनिंग कॉरिडॉर… गडचिरोलीच्या विकासासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा ‘मास्टर प्लॅन’
Shivendraraje Bhosale: विद्यार्थ्यांची होणारी अडचण आणि दळणवळणाच्या समस्या सोडवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचा बैठकीत निर्णय.

Shivendraraje Bhosale – गडचिरोली जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पावले उचलली आहेत. या दुर्गम जिल्ह्याच्या विकासात्मक बदलात राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग महत्वाची भूमिका बजावेल, अशी ग्वाही बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासकामे, रस्ते व पूल प्रकल्प, गोंडवाना विद्यापीठ,
मायनिंग कॉरिडॉर तसेच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम मंडळ, गडचिरोली येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, खा. डॉ. नामदेव किरसान, आ.मिलिंद नरोडे, आ.धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,
सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूरचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता श्रीमती नीता ठाकरे, गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सोनाली चव्हाण, पी. एम. ढोंग यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील लहान-मोठे पूल, नाल्यांवरील तसेच ओढ्यांवरील पूल आणि शाळा व वस्ती परिसरातील पूल यांचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन,
ज्या ठिकाणी पुलांअभावी किंवा पुलांच्या अडचणीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास विलंब होत आहे अथवा नागरिकांना दळणवळणाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशा कामांसाठी गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या तयार करण्यात येत असलेल्या डीपीआरमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी,
जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकार्यांचा समावेश करून स्थानिक गरजा व प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आराखडा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना ना. भोसले यांनी दिल्या. डीपीआरमध्येे समाविष्ट कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी प्रभावीपणे पाठपुरावा करावा, असेही निर्देशही त्यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यात पूर्ण झालेल्या विकासकामांचाही आढावा घेण्यात आला.
यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने 129 क्षमतेचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, विसापूर रोड येथील बांधकाम तसेच अहेरी येथे 12 नवजात अर्भकांसाठीच्या रुग्णालयाच्या बांधकामाचा समावेश आहे. अतिवृष्टी व पुरामुळे काही रस्ते व पूल काही कालावधीसाठी वाहतुकीस बंद झाले होते. या बाधित मार्गांची सद्यस्थिती, दुरुस्तीची कामे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.





