Sanjay Raut : शिवाजी महाराज अन् बाजीराव पेशवे मांसाहार करायचे; फडणवीस महाराष्ट्राला नामर्द बनवताहेत, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व कत्तलखाने आणि मांस, मच्छी विक्रीच्या दुकानांवर 24 तासांसाठी बंदी घातली आहे. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि मोठ्या जनावरांची कत्तल बंद ठेवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
हा निर्णय 1988 च्या प्रशासकीय ठरावाच्या आधारे घेण्यात आला असून, बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी याला मान्यता दिली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि नागपूर महानगरपालिकांनीही स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवर बंदी घातली आहे, ज्यामुळे हा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.
संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी या बंदीवर तीव्र आक्षेप घेत महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन आहे, धार्मिक उत्सव नाही. हे स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाही. स्वातंत्र्यासाठी रक्तपात आणि हिंसाचार झाला. मांसाहार बंदीचा हा फतवा कोणी काढला? याचे जनक कोण? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी पुढे म्हटले, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण-भात, तूप किंवा श्रीखंड-पुरी खाऊन युद्ध लढत नव्हते. ते मांसाहार करायचे. बाजीराव पेशवेही मांसाहार करायचे, कारण युद्ध लढण्यासाठी ताकद लागते. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना मांसाहार करावा लागतो. फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक आणि नामर्द बनवत आहात. तुम्हाला मांसाहार नको असेल तर नका करू, पण लोकांवर बंदी का लादता? हा देश आहे की बंदीशाळा? असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सरकार रेडे, बकरे, कोंबड्या कापून सत्तेत आले
संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या स्थापनेचा उल्लेख करत थेट फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “जे सरकार गुवहाटीतील कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे, बकरे, कोंबड्या कापून सत्तेत आले, त्यांना मांसाहाराचा तिटकारा कसा काय येईल? तिथे रेडे कापले गेले आणि त्याचा प्रसादही खाल्ला गेला. अशा सरकारचे जनक फडणवीस आता शाकाहाराचा फतवा काढतात? हा थोतांडपणा बंद करा. असं संजय राऊत म्हणाले.





