Top 10 News : ‘पुरावे माझ्याकडे, कुणालाच सोडणार नाही : देवेंद्र फडणवीस नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाम भूमिका मांडलीय. “खरात प्रकरणाचा भंडाफोड आम्हीच केला,” असा दावा करत त्यांनी तपास इंटेलिजन्सच्या आधारे सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, नाशिक पोलीस आयुक्तांसह तपास वेगाने सुरू आहे. यामध्ये कुणालाही सोडणार नाही. कोणाकडे पुरावे असतील त्यांनी पुढे आणावेत, त्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. विरोधकांवर टीका करताना त्यांनी “हवेत बोलण्यात अर्थ नाही” असे म्हणत राजकीय रंग देण्याचा आरोप केला. महिलांच्या सन्मानाचा मुद्दा महत्त्वाचा असून, दोषींना शिक्षा होईपर्यंत सरकार शांत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. २) अशोक खरातची कोठडीतही भोंदूगिरी सुरूच नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या पोलिस कोठडीत असतानाही त्याची भोंदूगिरी थांबलेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. चौकशीदरम्यान तो पोलिसांनाच भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीची दिशा बदलण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी खरात अशा प्रकारची युक्ती वापरत असल्याचा संशय आहे. मात्र पोलिसांनीही कठोर भूमिका घेत “कायद्यापुढे कुणीही मोठं नाही” असा स्पष्ट इशारा दिलाय. दरम्यान, अशोक खरातविरोधात गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी त्याची एसआयटीमार्फत कसून चौकशी सुरू असून, नाशिक क्राइम ब्रँचकडून तपासाला वेग देण्यात आलाय. ३) गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा मोठा निर्णय इराण-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या उर्जासंकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गॅस तुटवडा गंभीर झाला होता. मात्र आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत हॉटेल आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा दिलाय. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल, उपहारगृह, ढाबे, औद्योगिक कॅन्टीन आणि कम्युनिटी किचन्सना 20 टक्के एलपीजी (LPG) पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आलेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार हा निर्णय लागू केला जाणार आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा कमी होण्याची शक्यता असून, पुणे-मुंबईसारख्या शहरांतील हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा अद्याप कायम असून, नागरिकांना वेळेवर गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. ४) रॉकेल परत येणार, पण कोणाला मिळणार? राज्यात शिधापत्रिकेवरून बंद झालेले रॉकेल वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ३७ लाख ४४ हजार लिटरचा कोटा निश्चित करण्यात आलाय. मात्र, हे रॉकेल नेमके कोणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने प्रशासन आणि दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांनाच रॉकेल द्यावे, अशी शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळे केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकाधारकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. रॉकेल वितरणासाठी परवाने नूतनीकरण, नवीन मंजुरी आणि साठवणुकीची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. काही ठिकाणी रास्त धान्य दुकानदारांनाही परवाने देण्याचा निर्णय आहे. जिल्हानिहाय कोटा आणि वितरणाची तारीख अद्याप जाहीर नसल्याने दुकानदार आणि नागरिक दोघेही संभ्रमात आहेत. ५) उड्डाणानंतरच हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं कतारमध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झालाय, तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने दुपारी नियमित उड्डाण घेतले होते. मात्र काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने ते समुद्रात कोसळले. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. कतारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार विशेष पथके घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचाव मोहिम राबवत आहेत. दरम्यान, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे चिंतेत भर पडलीय. या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. ६) भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. तर आणखी तीन जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. लालाचेरुवु, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या भागांत फेब्रुवारीपासून भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचे तपासात उघड झाले. दूध पिल्यानंतर नागरिकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, लघवी बंद होणे आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारखे गंभीर त्रास जाणवू लागले. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली असून दुधात ‘एथिलीन ग्लायकॉल’ हे विषारी रसायन मिसळले जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे 20 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागलेय. या प्रकरणी संबंधित डेअरीवर कारवाई सुरू असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होतेय. ७) नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केलाय. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी एकही निवडणूक गमावलेली नाही, ही बाब विशेष ठरलीय. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि दीर्घकाळ हे पद यशस्वीपणे सांभाळले. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेतली. २०१४ मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही त्यांनी सलग विजय मिळवत सत्ता कायम राखलीय. देशसेवा हीच सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ८) ट्रम्पच्या अल्टिमेटमला इराणचा कडक इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमला इराणने ठाम आणि आक्रमक प्रत्युत्तर दिलेय. इराणच्या लष्करी प्रवक्त्याने स्पष्ट इशारा देत सांगितले की, इंधन किंवा ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाल्यास आखाती प्रदेशातील अमेरिकन व मित्र राष्ट्रांच्या ठिकाणांना लक्ष्य केलंय. इराणने ऊर्जा प्रकल्प, आयटी नेटवर्क आणि क्षारविरहितीकरण केंद्रांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिलीय. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, इराणने युद्धविरामाचा प्रस्तावही स्पष्टपणे फेटाळला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी युद्धाचा “पूर्ण आणि कायमस्वरूपी अंत” हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटलेय. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली असून, संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. ९) रितेश देशमुखकडून ‘धुरंधर २’चं भरभरून कौतुक अभिनेता रितेश देशमुख याने ‘धुरंधर २’ पाहिल्यानंतर चित्रपटाचं जोरदार कौतुक केलंय. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने या चित्रपटाला “अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव” असं म्हटलंय. रणवीर सिंहच्या अभिनयावर प्रतिक्रिया देताना रितेश म्हणाला, “स्क्रीनवर तू जादू केलीस. प्रत्येक फ्रेममध्ये तुझी उपस्थिती जाणवली.” एवढंच नाही तर राकेश बेदी, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या अभिनयाचंही त्याने कौतुक केलंय. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या कामाला “विलक्षण” म्हणत प्रत्येक फ्रेम खास असल्याचं तो म्हणाला. चित्रपटाला प्रेक्षकांसह सेलिब्रिटींकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असून ‘धुरंधर २’ सध्या चर्चेचा विषय ठरलाय. १०) व्हायरल अफवेवर विराट कोहलीचे चोख प्रत्युत्तर आयपीएल २०२६ पूर्वी आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याबद्दल एक विचित्र अफवा सोशल मीडियावर पसरली होती. आयपीएल सामन्यांच्या दरम्यान ३ दिवसांचा गॅप मिळाल्यास विराटने लंडनला जाण्यासाठी आरसीबीकडे चार्टर्ड फ्लाईटची मागणी केल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. विराटने या बातमीचा स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करत दोन ‘हसणारे इमोजी’ टाकले आहेत. याद्वारे त्याने ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट करत तिची थट्टा उडवलीय. सध्या विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये कसून सराव करत असून त्याचे पूर्ण लक्ष आगामी हंगामावर आहे.