Devendra Fadanvis : सहन होत नाही, अन् सांगताही येत नाही; देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधीना टोला

लातूर : भारतीय संविधान आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विरोधकांचा विश्वास नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले, त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केला आहे. त्या निवडणूक आयोगाने त्यांना (राहुल गांधी) चार पत्र दिली आहेत. तुम्ही जे बाहेर सांगत आहेत, ते या ठिकाणी येऊन शपथेवर सांगा. यांची का हिंमत नाही? हे का जात नाही तिथे? का पुरावे देत नाहीत? असे प्रश्न उपस्थित करत फडणवीस म्हणाले की, आपला जो रोज पराभव होत आहे, तो पराभव पचवता येत नाही, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, यांची अशी अवस्था आहे. त्यामुळे ते (राहुल गांधी) अशाप्रकारे वागत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुख्यमंत्री चोरांचे सरदार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, त्यामुळे लोकं आम्हाला मतदान करतात. पण त्यांनी लोकांच्या जनादेशाची चोरी केली होती. ते जनादेश चोर आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवले.
जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसे वागावे, हे आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैवं आहे. बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेलेचपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोट्याळ्यात कफन खरेदीतही चोरी केली. त्यातही पैसा कमावला. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणू का? पण मला अशी भाषा वापरायला आवडत नाही.





