Top 10 News : मंत्रालयात लाचखोरीचा भंडाफोड; 6.37 लाखांची लाच घेताना बडा अधिकारी जाळ्यात राज्याच्या प्रशासकीय केंद्रस्थानी असलेल्या मंत्रालयात लाचखोरीचे मोठे प्रकरण उघडकीस आलेय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना 6 लाख 37 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केलीय. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याची माहिती समोर आलीय. खारघर परिसरात सापळा रचून एसीबीने ही कारवाई केलीय. मंत्रालयातील भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी एसीबीकडून सलग कारवाया सुरू असून मार्चनंतर एप्रिलमध्येही मोठी अॅक्शन झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडालीय. सामान्य नागरिकाच्या वर्षभराच्या उत्पन्नाएवढी लाच स्वीकारली जात असल्याने संताप व्यक्त केला जातोय. २) त्या सीडीआरची चौकशी होणार; खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोन कॉल झाल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, सीडीआर मिळवण्याचा अधिकार फक्त तपास यंत्रणांनाच असून तो कसा लीक झाला याची चौकशी होणार आहे. संवेदनशील प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाऐवजी ठोस पुराव्यांवर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच एसआयटीला मोठ्या प्रमाणात माहिती मिळत असून या प्रकरणाची सर्व पाळेमुळे उघडकीस आणली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३) खरात प्रकरणातील महिला नैराश्यात; मानसोपचार तज्ज्ञांकडे घेतली धाव नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीय. खरातसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांची मानसिक स्थिती बिघडली असून अनेक महिला नैराश्याच्या गर्तेत गेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेत उपचार सुरू केलेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक महिलांची ओळख उघड झाल्याने त्यांना सामाजिक दबाव आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. काही महिलांना घरातच तोंड लपवून राहावे लागत असल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू असून पीडित महिलांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ४) “एका एका घरात पाच पाच बंदूक…”; भाजप आमदाराचे चिथावणीखोर वक्तव्य तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रामनवमीच्या सभेत बोलताना त्यांनी प्रत्येक घरात पाच पाच बंदुका असाव्यात, असं वक्तव्य केलंय. धर्मासाठी लढणाऱ्यांनी शस्त्र परवाने घ्यावेत आणि देशद्रोह्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज राहावे, असंही ते म्हणालेत. तसेच त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या मदरसे बंद करण्याच्या विधानाला समर्थन देत कठोर कारवाईची मागणी केलीय. मदरशांमध्ये देशविरोधी कारवाया चालतात, असा दावा करत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. ५) ढोल-ताशावर डान्स, घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक अनोखी घटना समोर आलीय. घटस्फोटानंतर मुलीचे जल्लोषात स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. निवृत्त न्यायाधीश डॉ. ज्ञानेंद्र शर्मा यांनी मुलगी प्रणिताचा घटस्फोट झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात घरी स्वागत केलं. फुलांचा हार घालत तिचा सन्मान करण्यात आला, तर परिसरात लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. प्रणिताचे 2018 मध्ये गौरव अग्निहोत्री याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र, सासरकडून मानसिक छळ होत असल्याने वाद वाढत जाऊन प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिल्यानंतर वडिलांनी मुलीला सन्मानाने घरी आणले. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांकडून या कृतीचे कौतुक केले जातेय. ६) संपूर्ण अमेरिकेत हाहाकार, इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या इराणमधील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक इंधन संकट तीव्र झाले असून अमेरिकेलाही त्याचा मोठा फटका बसतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली असून नागरिकांच्या खिशावर ताण वाढलाय. अमेरिकेत पेट्रोलचा दर प्रति गॅलन 4.09 डॉलरपर्यंत पोहोचला असून डिझेल 5.53 डॉलरपर्यंत महागलाय. इंधन दरवाढीचा परिणाम कृषी, उद्योग आणि परिवहन क्षेत्रावर होत आहे. महागाई वाढल्यामुळे ई-कॉमर्स कंपनी Amazon ने डिलिव्हरीवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय, तर विमान तिकीट दरही वाढलेत. इराणविरोधातील कारवाईमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे अमेरिकेचे आर्थिक नुकसान वाढत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेय. ७) आयफोन १८ प्रो मॅक्समध्ये DSLR सारखा कॅमेरा! सॅमसंगसोबत भागीदारी करत अॅपलचा मोठा धमाका अॅपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि Pro Max संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, या सीरिजमध्ये फोटोग्राफीवर विशेष भर दिला जाणार आहे. iPhone 18 Pro Max मध्ये 48 मेगापिक्सेलचा नवीन कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, अॅपल यावेळी सॅमसंगसोबत भागीदारी करून ‘थ्री-लेअर स्टॅक्ड’ कस्टम सेन्सर वापरण्याची शक्यता आहे. यासोबतच DSLR सारखा ‘व्हेरिएबल अपर्चर’ फीचर देण्याची तयारी असून, त्यामुळे फोटो अधिक प्रोफेशनल दर्जाचे मिळतील. कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटोग्राफी शक्य होणार आहे. टेलिफोटो कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरातही मोठे अपग्रेड अपेक्षित आहेत. iPhone 18 Pro आणि Pro Max सप्टेंबर 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता असून, फोटोग्राफीसाठी हा आयफोन मोठा गेमचेंजर ठरू शकतो. ८) बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी.! रॉयल एनफील्ड ‘ही’ जबरस्त बाईक झाली लाँच रॉयल एनफील्ड ने आपल्या लोकप्रिय हंटर 350 बाईकचा नवीन ‘बेस प्रीमियम’ व्हेरिएंट भारतीय बाजारात लाँच केलाय. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या या बाईकला आता अधिक फीचर्ससह अपडेट करण्यात आलेय. नवीन व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.50 लाख ठेवण्यात आलीय. या मॉडेलमध्ये अलॉय व्हील्स, अपडेटेड गोल हॅलोजन हेडलाइट आणि डिजिटल-ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. तसेच सिंगल-चॅनल ABS आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लचसारखी सुविधा मिळतेय. कंपनीने या बाईकमध्ये ‘मुंबई यलो’ आणि ‘मूनशॉट व्हाइट’ असे दोन नवीन आकर्षक रंग पर्याय दिलेत. नवीन-रेट्रो लूक आणि सुधारित फीचर्समुळे ही बाईक तरुण ग्राहकांसाठी अधिक आकर्षक ठरण्याची शक्यता आहे. ९) ‘चांद मेरा दिल’चे पोस्टर रिलीज; अनन्या-लक्ष्यच्या रोमँटिक जोडीची चर्चा धर्मा प्रॉडक्शन्सच्या आगामी ‘चांद मेरा दिल’ या रोमँटिक सिनेमाचे पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. करण जोहर निर्मित या चित्रपटात अनन्या पांडे आणि लक्ष्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमध्ये लक्ष्यचा शर्टलेस लूक लक्ष वेधून घेत असून, त्यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पोस्टरसोबतच निर्मात्यांनी उद्या सकाळी 11 वाजता मोठी घोषणा होणार असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे टीझर किंवा ट्रेलर लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान, अनन्या पांडेच्या कास्टिंगवर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून “पुन्हा अनन्या?” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तरीही ‘आरव’ आणि ‘चांदनी’च्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. १०) शुबमन गिलच्या दुखापतीवर पार्थिव पटेलने दिली मोठी अपडेट गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल स्नायूंच्या दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला होता. त्याच्या अनुपस्थितीत राशिद खानने नेतृत्व केले. आता ८ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी माहिती दिली की, गिलची दुखापत गंभीर नाही. गेल्या १८ महिन्यांतील गिलची ही चौथी दुखापत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पार्थिव पटेल यांनी गिल लवकरच मैदानात परतेल अशी आशा व्यक्त केली असली, तरी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय वैद्यकीय पथकाच्या अहवालानंतरच घेतला जाईल.