Pune District : राजगुरुनगरात शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन
Pune District : आंदोलनाच्या शेवटी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. हनुमान मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली.

राजगुरुनगर : अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राजगुरुनगर येथील शनि-हनुमान मंदिर परिसरात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दानपेटीतील पैशांचा अपहार करणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी, “अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील दानही सुरक्षित नसेल, तर हे कसले हिंदुत्व?” असा सवाल उपस्थित केला. तसेच चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचाही जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, खेड पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, महिला तालुका प्रमुख उर्मिला सांडभोर, आमदार बाबाजी काळे यांच्या पत्नी वैशाली काळे, एल. बी. तनपुरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनाच्या शेवटी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. हनुमान मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली.
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील दानपेटीतील रक्कमच सुरक्षित राहू शकत नसेल, तर देशातील सामान्य भक्तांचा विश्वास कुठे राहणार? श्रीरामांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या प्रकरणावर मौन बाळगण्याऐवजी सत्य जनतेसमोर आणावे. दानपेटी चोरीप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, हीच आमची ‘रामरक्षा आंदोलन’च्या माध्यमातून ठाम मागणी आहे.
-विजया शिंदे, पुणे जिल्हा महिला संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील रकमेच्या अपहाराचा आरोप हा अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आता याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
-शिवाजी वर्पे, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष





