Shirur News: एकाच शाळेत वर्षानुवर्षे ठिय्या मांडणाऱ्या शिक्षकांचे ‘बोगस’ कनेक्शन उघड; सवलती लाटणाऱ्यांवर ग्रामस्थ आक्रमक

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – शिरूर तालुक्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे मिळणाऱ्या सवलतींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे शिक्षण व्यवस्थेचा तोल बिघडत आहे. काही शिक्षकांकडून संवेदनशील सवलतींचा होणारा गैरवापर आणि त्यास अधिकारीवर्गाकडून मिळणारे छुपे संरक्षण यामुळे तालुक्यातील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या सवलतींचा फायदा घेत काही शिक्षक वर्षानुवर्षे घराजवळच्या किंवा सोयीच्या शाळांमध्येच तळ ठोकून बसले आहेत. याउलट, गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना दुर्गम व गैरसोयीच्या शाळांमध्ये काम करावे लागत आहे. एकाच गावात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या या शिक्षकांनी विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतेही विशेष काम केल्याचे दिसत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे.
बदली प्रक्रियेतही मोठी अनियमितता दिसून आली असून, तालुक्यातील काही शाळांमध्ये एकाही शिक्षकाची बदली झाली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती थांबत आहे. ‘झारीतील शुक्राचार्य’ म्हणून ओळखले जाणारे काही अधिकारी आणि शिक्षकांचे साटेलोटे असल्याने बोगस प्रकरणांवर जाणीवपूर्वक कारवाई होत नसल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे.
प्रामाणिक शिक्षकांवर होत असलेला हा अन्याय शिक्षक मनोबलावर आघात करणारा आहे.शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने वैद्यकीय पुन:चौकशी करण्याची, वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्या शिक्षकांची खांदेपालट करण्याची आणि बदली प्रक्रियेतील विसंगतींची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यास शिक्षण व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास ढासळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.





