Bus Fire News – पुणे–अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरासमोर गुरूवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील संजय ट्रॅव्हल्सची बस (एमएच ४० सीटी०९५७) पुण्याहून नागपूरकडे निघाली होती. रांजणगाव गणपती येथे बस पोहोचताच इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून चालक व मदतनीसाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणांतच बसला भीषण आग लागून ती वेगाने पसरली. बसच्या आतील आसने व पडद्यांमुळे आगीने लवकरच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. प्रवाशांच्या दोन बॅगा वगळता सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. आगीदरम्यान बसच्या टायरचे स्फोट झाल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. तसेच बघ्यांची गर्दी आणि बस रस्त्याच्या कडेला असल्याने पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळित झाली होती.