Shirur Crime – शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, खंडाळे आणि पिंपरी दुमाला परिसरात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन साहित्यावर डल्ला मारला आहे. आधीच निसर्गाची अनिश्चितता आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात शेतातील पाइप कापून नेल्याने उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित खेडकर, गहिनीनाथ नरवडे, भानुदास खेडकर, संकेत नरवडे, कैलास नरवडे आणि भाऊसाहेब नरवडे या शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक संच कापून लंपास करण्यात आले आहेत. सकाळी शेतावर गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. उन्हाळी पिकांसाठी कर्ज काढून बसवलेली ही यंत्रणा चोरीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. खते, बियाणे आणि वीजबिलाच्या खर्चात भर पडलेली असतानाच आता सिंचन साहित्यासाठी पुन्हा नव्याने गुंतवणूक कशी करावी, असा प्रश्न या बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. परिसरात यापूर्वीही कृषी साहित्य चोरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत, मात्र पोलीस यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. चोरट्यांनी शेती साहित्याला लक्ष्य केल्याने रात्रीच्या वेळी शेतात राखण करायची की घरी झोपायचे, असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.