Shirur MD Drug – रांजणगाव एमआयडीसी परिसरासह संपूर्ण शिरूर तालुका सध्या ‘एमडी’ (मेफेड्रोन) सारख्या अत्यंत घातक अमली पदार्थाच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. औद्योगिक विकासाच्या नावाखाली सुरू झालेल्या या काळ्या व्यवसायाने आता ग्रामीण भागातही पाय रोवले असून, तालुक्यातील तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. मागील महिन्यात पोलिसांनी काही प्रमाणात ड्रग्ज जप्त करून एकाला अटक केली असली तरी, या रॅकेटमधील महत्त्वाचे आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई केवळ आकडेवारी दाखवण्यासाठी की खरोखर ड्रग्जची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, पोलिसांकडून होणाऱ्या कारवायांमध्ये केवळ छोटे विक्रेते किंवा व्यसनाधीन तरुणांना लक्ष्य केले जाते. मात्र, या व्यवसायाचे खरे सूत्रधार, मोठे पुरवठादार आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणारे ‘मोठे मासे’ अजूनही मोकाट आहेत. रांजणगाव एमआयडीसीमध्ये परप्रांतीय कामगारांची मोठी संख्या आणि दळणवळणाची सुलभता याचा फायदा ड्रग्ज माफिया घेत आहेत. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी उघडपणे अमली पदार्थांचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. निवडणुकांच्या काळातही मतदारांना आकर्षित करण्यासाठी ड्रग्जचा वापर झाल्याचे गंभीर आरोप झाले होते, मात्र त्याबाबत कोणतीही ठोस चौकशी न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. शिरूर पोलीस स्टेशन सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, फक्त दाखवण्यापुरती कारवाई न करता या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. जर वेळीच या माफियांचा बंदोबस्त झाला नाही, तर तालुक्यातील शेकडो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता पोलीस प्रशासन या ‘मोठ्या माशांना’ कधी गळाला लावणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तरुणाईचे भविष्य धोक्यात एमडीसारख्या घातक ड्रग्जमुळे अनेक तरुणांचे आरोग्य आणि करिअर उद्ध्वस्त होत आहे. कुटुंबाची शांतता हरवत चालली असून, अनेक घरे देशधडीला लागली आहेत. प्रशासनाने केवळ कागदोपत्री मोहीम न राबवता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून या साखळीचा नायनाट करणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तपासी अधिकाऱ्यांची भूमिका या प्रकरणातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले की, मागील महिन्यात केलेल्या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, यातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्पष्ट केले की, संबंधित प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई सुरू आहे. तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, पंचायत समिती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळा-कॉलेजांमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.