प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – एका महिलेला मारहाण करून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केल्याप्रकरणी कंपनीतील सुपरवायझरवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. पीडित महिला मूळ मध्य प्रदेशची असून सध्या रांजणगाव येथे वास्तव्यास आहे.ही घटना गुरूवारी (दि. २०) सकाळी दहा ते दुपारी बाराच्या दरम्यान घडली. आरोपी सर्फराज सैपन शेख (रा. बोरगाव देशमुख, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर, सध्या रा. रांजणगाव) हा पीडितेच्या कामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली, तसेच जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. घटनेनंतर शुक्रवारी (दि. २१) पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ३५२, ३५१(२)(३) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी अटक केली असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व त्यांच्या पथकाने केली.