Pune Crime | ड्रग्स व्यवहारातून थरार ; मेफेड्रोन खरेदीसाठी गेलेल्या तिघांवर हल्ला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मेफेड्रोन या अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी (दि.२) मध्यरात्री घडली. टोळक्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून, खुनाच्या प्रयत्नाबद्दल समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी आकाश उणेचा, चैतन्य, तसेच त्यांच्यादोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींच्या हल्ल्यात राहुल बंडू पवार (वय ३१, सध्या रा. वाडकर मळा, महंमदवाडी, काळेपडळ पोलीस ठाण्याजवळ, मूळ रा. रांजणी, ता. गेवराई, जि. बीड ), गौरव नितीन साठे, राजा मुन्ना पंडीत जखमी झाले आहेत. पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार पवार, साठे, पंडीत हे मंगळवारी (२ सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी उणेचा आणि साथीदारांकडून मेफेड्रोन खरेदी करण्यासाठी गेले होते. सिटी चर्चसमोर आरोपींनी त्यांना भेटायला बोलाविले होते. आरोपींनी पवारकडून पैसे घेतले.
पैसे घेतल्यानंतर त्याला मेफेड्रोन दिले नाही. यामुळे वाद झाल्यावर आरोपींनी शिवीगाळ करुन त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार आरोपींचा शोध सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.





