संगमनेर – शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहे. पक्षाला पोषक वातावरण असून कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघावरील दावा कॉंग्रेस सोडणार नाही. तो कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी केले.
संगमनेर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्ञानेश्वर गायकवाड, करण ससाने, उत्कर्ष रूपवते, हेमंत ओगले, सचिन गुंजाळ, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, मीनानाथ पांडे, सुरेश थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
हांडोरे म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन भाजप पक्ष सत्तेत आला असून कॉंग्रेसला बदनाम केले जात आहे. उद्योग धार्जिणे धोरण राबवून भाजप जातीयवाद, धर्मवाद प्रांतवाद यांच्या माध्यमातून राजकारण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत आहे. कोअर कमिटीच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या जागाचा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. यानुसार कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे प्राबल्य जास्त आहे. त्यानुसार जागांची विभागणी केली जाणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेस पक्षाने लढवावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. निवडीबाबत आमदार बाळासाहेब थोरात व स्क्रीनिंग कमिटी मार्फत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. देशात व राज्यात सध्या भाजप विरोधात परिवर्तनाची लाट सुरू असून महाराष्ट्रातून सर्वाधिक कॉंग्रेस खासदार निवडून देण्याचा मानस असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आ. कानडे म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती आहे. भाजप जाणीवपूर्वक जातीयवादाचे राजकारण करत असून लोकशाहीसाठी हे धोक्याचे आहे. राजेंद्र नागवडे म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदार संघात अस्वस्थता आहे. कॉंग्रेस पक्षासाठी अनुकूलता आहे. कॉंग्रेस पक्षाने आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार द्यावा. प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कानवडे यांनी केले तर आभार सोमेश्वर दिवटे यांनी मानले