Shikrapur News : शिक्रापुरात आढळली चक्क चार पायांची कोंबडी ; पाहण्यासाठी प्राणीमित्रांची झुंबड

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – येथे एका चिकनच्या दुकानात चक्क चार पायांची कोंबडी आढळून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी अनेक प्राणी पक्षी मित्र गर्दी करत आहेत.शिक्रापूर येथील सिकंदर शेख यांचा चिकन व्यवसाय असून, सकाळी दुकान उघडून कोंबड्यांना खाद्य टाकत असताना त्यांना अचानक एका कोंबडीला जादा पाय असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने मुलगा शेरखान शेख यास माहिती दिली.
त्यानंतर सेवानिवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. राजेंद्र त्र्यंबके, प्राणीमित्र अमोल कुसाळकर, गणेश टिळेकर यांसह अनेकांनी या कोंबडीची पाहणी केली.पाहणीमध्ये कोंबडीला पूर्ण वाढ झालेले चार पाय आणि चारही पायांना स्वतंत्र नखे असल्याचे दिसून आले.
याबाबत बोलताना सेवानिवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले की, एका जनुकीय बदलामुळे हा प्रकार घडतो आणि या जन्मजात स्थितीला ‘पॉलीमेलिया’ (Polymelia) असे म्हणतात. प्राणीमित्र गणेश टिळेकर आणि शेरखान शेख यांनी, “आम्ही आजपर्यंत अनेक प्राणी-पक्षी पाहिले, मात्र चार पायांची कोंबडी प्रथमच पाहिली,” असे सांगितले.





