Shashikant Shinde: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा केवळ सुरुवात; आंदोलनावर शशिकांत शिंदेंचे खळबळजनक विधान
Shashikant Shinde: लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनापुढे सर्वसत्ताधीश सत्ताधारी झुकले; शशिकांत शिंदेंकडून आंदोलक विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे कौतुक

Shashikant Shinde – केंद्र सरकारच्या कथित हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात देशभरातील तरुणांनी उभारलेल्या संघर्षामुळे अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून, हा देशातील जागरूक तरुणाईच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या शक्तीचा देदिप्यमान विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
शिंदे यांनी म्हटले आहे, लोकशाहीच्या मार्गाने सातत्याने संघर्ष करणार्या तरुणांनी केंद्र सरकारला झुकण्यास भाग पाडले. देशातील वाढता जनक्षोभ, तरुणांचा तीव्र रोष आणि रस्त्यावर उतरलेले आंदोलन पाहून स्वतःला सर्वसत्ताधीश समजणार्या सत्ताधार्यांना अखेर माघार घ्यावी लागली. ही घटना लोकशाहीच्या बळाची साक्ष देणारी असून जनतेच्या एकजुटीसमोर कोणतीही सत्ता टिकू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा केवळ एका व्यक्तीचा राजीनामा नसून देशातील तरुणांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय आहे. हा बदलाची नांदी ठरणारा निर्णय असून देशात लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणार्या प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचा अपमान करत त्यांना कॉक्रोच अर्थात झुरळ अशी अवमानकारक उपमा देण्यात आली होती.
मात्र, त्याच तरुणाईने शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करत सत्ताधार्यांना झुकण्यास भाग पाडले. त्यामुळे तरुणांच्या सामर्थ्याला कमी लेखण्याची चूक कोणत्याही सत्ताधार्यांनी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. स्वतःला सर्वशक्तिमान समजणार्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जनतेचा उद्रेक झाला की मोठमोठ्या राजसत्तांची सिंहासनेही धुळीस मिळतात, असे सांगत शिंदे यांनी देशभरातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक आणि जागरुक नागरिकांचे अभिनंदन केले.





