Shashank Ketkar Video: मतदान केंद्राबाहेर कचऱ्याचा ढीग; शशांक केतकरचा व्हिडीओ चर्चेत

Shashank Ketkar Video: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. सामान्य नागरिकांसह अनेक कलाकारही मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशातच मराठी अभिनेता शशांक केतकरने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
शशांक केतकर आज मतदानासाठी ठाण्यातील एका शाळेत गेला होता. मात्र ज्या शाळेत त्याने मतदान केलं, त्या शाळेच्या अगदी बाहेर कचऱ्याचा मोठा ढीग दिसल्याने त्याने नाराजी व्यक्त केली. याच कचऱ्याचा व्हिडीओ शशांकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये शशांक म्हणतो, “ज्या शाळेत मी मतदान केलं, त्या शाळेच्या बाहेरच ही अवस्था आहे. उद्या कुठल्याही पक्षाचा कुणीही निवडून आला, तरी स्वच्छतेसारख्या मूलभूत गोष्टींसाठी कोणी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा वाटत नाही. नागरिकसुद्धा स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहतील, असंही वाटत नाही.” पुढे तो म्हणतो, “ही माझ्या मनातली उदासीनता नाही, ही वस्तुस्थिती आहे. ठाण्यातील एका इंटरनॅशनल शाळेच्या दारातच कचऱ्याची ही अवस्था आहे.”
शशांक केतकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून वाहतूक कोंडी, ट्रॅफिक, स्वच्छता अशा सामाजिक विषयांवर तो सातत्याने मत मांडताना दिसतो. याआधीही त्याने अशा अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला आहे.
दरम्यान, शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी त्याच्या स्पष्ट भूमिकेचं कौतुक केलं आहे.


