प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच सोशल मीडियावर राजकीय चर्चांना अचानक वेग आला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), व्हॉट्सअॅप सारख्या प्लॅटफॉर्मवर विविध पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्सच्या माध्यमातून समर्थक, कार्यकर्ते आणि मतदार आपापली मते नोंदवत आहेत. डिजिटल विश्वात निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक सातत्याने पोस्ट, रील्स, स्टेटस आणि लाईव्ह चर्चांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच रंगत आले असून त्याचा सर्वाधिक ठसा सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. घराघरात मोबाइल पोहोचल्याने आणि तरुणाई सोशल मीडियावर सक्रिय असल्याने निवडणूक चर्चांसाठी डिजिटल माध्यम मोठे व्यासपीठ ठरत आहे. कार्यकर्त्यांच्या पोस्टमधून एकमेकांवर उपरोधिक टोले, कोपरखळ्या आणि विनोदात्मक मिम्सचा वर्षाव होत असून त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच रंगत आली आहे.उमेदवार आपले जाहीरनामे, केलेली विकासकामे, पूर्वीचा कार्यकाळ आणि भविष्यातील आश्वासने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मांडत आहेत. विरोधकांवर टीका, प्रतिउत्तरांची देवाणघेवाण आणि समर्थकांच्या प्रतिक्रिया यामुळे या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर कमेंट्स आणि शेअरच्या माध्यमातून या चर्चेत सहभागी होताना दिसत आहे.डिजिटल माध्यमांवर काही ठिकाणी अफवा, दिशाभूल करणारे संदेश आणि भडकावू मजकूरही फिरताना दिसत असल्याने निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासनाने सजग भूमिका घेतली आहे. पिंपरी–चिंचवड पोलिसांनी नागरिकांना जबाबदारीने सोशल मीडिया वापरण्याचे आवाहन केले असून कुणाच्याही भावना दुखावतील अशा पोस्ट टाळण्याचे निर्देश दिले आहेत. आचारसंहिता भंग होणार नाही, यासाठी विशेष पथकांकडून ऑनलाइन देखरेख ठेवली जात आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक स्थानिक प्रश्नांनाही आवाज देत आहेत. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूककोंडी, निळ्या पूररेषेतील टीडीआरचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन आणि कररचना या विषयांवर मतदार थेट प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे उमेदवारांसमोर उत्तरदायित्व वाढले असून त्यांना त्वरित प्रतिक्रिया द्यावी लागत आहे.एकूणच, या निवडणुकीत सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता मतदारसंवादाचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे.