Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं जनतेला आवाहन; मतदानाचं महत्त्व अधोरेखित करणारा व्हिडिओ शेअर

Prajakta Mali: राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून आज, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करत आहेत. त्यातच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनंही एक व्हिडिओ शेअर करत जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि सामाजिक विषयांवर आपली भूमिका मांडत असते. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिनं मतदानाचं महत्त्व ठळकपणे सांगितलं आहे. “उद्या १५ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आपण जगातील मोठ्या लोकशाहीपैकी एक आहोत आणि महाराष्ट्रातील जनता सुज्ञ व जबाबदार आहे,” असं ती व्हिडिओमध्ये म्हणते.
View this post on Instagram
पुढे ती म्हणते, “एक कलाकार म्हणून मी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करते की कोणतीही सबब न सांगता मतदान टाळू नका. वेळ काढून मतदान केंद्रात जा आणि आपलं मत नोंदवा. प्रत्येक मत अमूल्य आहे.”
मतदान हा केवळ हक्क नाही तर कर्तव्य असल्याचं सांगत प्राजक्ता म्हणाली, “आपलं आणि पुढच्या पिढीचं भविष्य उज्वल व्हावं यासाठी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाची प्रक्रिया आहे. त्यामुळे वेळेचं भान ठेवून मतदान करा. स्वतः मतदान करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करा.”
प्राजक्ता माळीच्या या आवाहनाला सोशल मीडियावर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.





