शरद पवारांनीच जरांगेंना मानगुटीवर बसवलं; लक्ष्मण हाकेंचा घणाघात, ओबीसींची संघर्ष यात्रा लवकरच

बीड: राज्यातील राजकीय वातावरण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करताना थेट हल्लाबोल केला आहे. “मराठा-ओबीसी वादाचं मूळ शरद पवारच आहेत.
त्यांच्या सांगण्यावरूनच मनोज जरांगे पाटील नावाचं मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं आहे,” असा घणाघात हाके यांनी बीड येथे बोलताना केला. यासोबतच, ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात लवकरच ‘संघर्ष यात्रा’ काढण्याची घोषणाही त्यांनी केली.
संघर्ष यात्रेची तयारी, मराठा आंदोलनाला प्रत्युत्तर
लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं की, ही संघर्ष यात्रा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून नसून, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी संविधानाच्या चौकटीत राहून केली जाईल. “आमचं आंदोलन व्यवस्थेला आव्हान देणारं नसून, संविधानाच्या रक्षणासाठी आहे. आम्ही मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभं करू,” असं हाके म्हणाले. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन ते या आंदोलनाची रणनीती आखत आहेत.
जरांगेंवरही टीकास्त्र
हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. “जरांगे यांना आरक्षणाची खरी गरज नाही. त्यांचा खरा डाव ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा आहे. पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईच्या दिशेने मोर्चा काढत आहेत,” असा गंभीर आरोप हाके यांनी केला. त्यांनी पुढे म्हटलं, “महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यात कधीच वाद नव्हता. हा वाद शरद पवार यांनीच निर्माण केला आणि त्यांच्या इशाऱ्यावरून जरांगे पाटील यांनी राज्यातील भाईचारा बिघडवला.”
मराठा मोर्चाला आव्हान
29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा मुंबईकडे कूच करणार आहे. यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मात्र, हाके यांनी आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना म्हटलं, “आम्ही कोणत्याही समाजाविरुद्ध नाही. आमचा लढा हा ओबीसींच्या हक्कांसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे.” या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून हाके आणि त्यांचे समर्थक राज्यभरात ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.





