नांदेड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला मागण्यांसाठी अल्टिमेटम देत २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजासह मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार जाहीर केला आहे. “एकदा मुंबईत गेलो, तर मागे हटणार नाही,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला. दरम्यान, नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवला. त्यांना तत्काळ नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात दाखल करून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. बैठकीत चोरट्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जिल्हाभरातील मराठा बांधव सहभागी झाले होते. मात्र, या वेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत अनेकांची पाकिटे चोरली. एका चोराला मराठा कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले आणि त्याला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत चोराला ताब्यात घेतले. गणेशोत्सवात मुंबई मोर्चाची तयारी मनोज जरांगे २९ ऑगस्टला मराठा समाजासह मुंबईत मोर्चा काढणार आहेत. याच काळात गणेशोत्सवामुळे मुंबईत गर्दी असणार आहे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकारने या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. यामुळे आगामी काळात काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे यांच्या मागण्या काय? मनोज जरांगे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबतचा अध्यादेश लागू करण्याची मागणी करत आहेत. सरकारने ऑगस्टअखेरपर्यंत या मागण्या पूर्ण कराव्यात, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने ते मराठा समाजासह मुंबईत धडकणार आहेत. या आंदोलनाच्या तयारीसाठी ते सध्या राज्यभर दौरे करत आहेत.