मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना फोन करून मागितला पाठिंबा; कशासाठी ? जाणून घ्या

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले असताना, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने ही निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपप्रणीत एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना आपला उमेदवार जाहीर केले असून, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भाजपची इच्छा आहे. मात्र, काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीनेही सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करत निवडणुकीत रंगत आणली आहे.
फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा मिळवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे उमेदवार असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती फडणवीसांनी या दोन्ही नेत्यांकडे केली आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केल्याचे कोणतेही वृत्त नाही. फडणवीसांवर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांशी समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांनी ठाकरे-पवारांशी संपर्क साधल्यास दुजोरा दिला आहे.
इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी
इंडिया आघाडीने एकजुटीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून पुढे केले आहे. संसद भवनातील निवडणूक कार्यालयात रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार यांनी ट्विटद्वारे यास दुजोरा देताना म्हटले आहे, “ही लढाई संविधान आणि लोकशाही बळकटीकरणाची आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारे बी. सुदर्शन रेड्डी या विश्वासाला सार्थ ठरवतील.” संजय राऊत यांनीही ट्विट करत विरोधी पक्षांच्या एकजुटीचे दर्शन घडल्याचे नमूद केले आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीचा इंडिया आघाडीला पाठिंबा
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी कितपत प्रतिसाद देईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, ही निवडणूक संविधान आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे. 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.





