Sharad Pawar | शासन विमानतळ करणारच ; तर मोबदलासाठी आग्रह धरा – शरद पवार

प्रभात वृत्तसेवा
दिवे – पुरंदरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प केंद्र सरकार करणार असून राज्य सरकारच्या माध्यमातून भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र विमानतळ प्रकल्प करण्यावर राज्य शासन ठाम असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना प्रकल्प करायचा आहे.आता पुढील काळात संबंधित शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्यात जादा मोबदला कसा मिळेल यासाठी आग्रह धरावा. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेण्याबाबत सूचना करतो. असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, प्रकल्प बाधित गावातील शेतकरी यांच्या पुणे येथील साखर संकुलात विमानतळाच्या प्रश्नावर बैठक पार पडली. पवार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करताना शासन शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक लावून देतो, असे सांगितले.
जिल्हाधिकारी दुडी यांनी एकूण क्षेत्रफळापैकी ३ हजार एकर जमीन मुख्य प्रकल्पसाठी अधिगृहित करण्यात येईल. उर्वरित जमीन इच्छुक शेतकऱ्यांकडून स्वीकारली जाईल, असे सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याची जमीन पारदर्शक पद्धतीने मोजणी केली जाईल. बाधितांना योग्य मोबदला दिला जाईल. पर्यायी ठिकाणी शेतकऱ्यांना विकसित भूखंड देण्यात येईल. प्रत्येक बाधित कुटुंबास अडीच गुंठे क्षेत्र उपलब्ध करून देण्यात येईल. बाधित शेतकऱ्यांच्या सहभागातून संयुक्त कंपनी स्थापन करून व्यावसायिक संधी निर्माण करण्याची योजना असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शरद पवार आणि जिल्हाधिकारी दुडी यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनांचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या उपस्थितीत पुढील बैठक लवकरच घेण्यात येऊन विमानतळ प्रकल्पाच्या प्रश्नांवर अंतिम तोडगा काढण्याबाबत दिशा ठरविण्यात येईल, असे निर्देश दिले. बाधित गावांतील शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर आधार ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दुडी यांनी केले आहे.
बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय झुरंगे, विमानतळ विरोधी कृती समितीचे संतोष हगवणे, संभाजी ब्रिगेडचे सागर जगताप, पारगावचे बापू मेमाणे, युवराज मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, नंदकुमार मेमाणे, जितेंद्र मेमाणे, उदाचीवाडीमधील बाळासाहेब मगर, एखतपूर मुंजवडीचे उपसरपंच तुषार झुरंगे, प्रशांत टिळेकर, रवींद्र फुले, सुनील धिवार, भूषण कुंभारकर, वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण गावातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता..
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, प्रकल्प बाधित गावातील शेतकरी प्रतिनिधीची बैठक पार पडली. यात शरद पवार, जितेंद्र दुडी यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यावर शेतकरी प्रतिनिधींनी स्वागत केले आहे. मात्र, शरद पवार यांची भूमिका प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांना रुचलेली नाही. कारण शेतकऱ्यांची मागणी प्रकल्प रद्द करण्याची होती. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे आणि निर्णायक भूमिका घ्यावी. याबाबत शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून भावना आहे. यासाठी शेतकरी शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. बारामती, पुणे, मुंबई, दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
शेतकऱ्यांना वालीच उरला नाही..
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी आमदार संजय जगताप, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेवून प्रकल्प पुणे नेण्यासाठी पाठपुरावा केला आहे. आताही पवार शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, शरद पवार यांनी शासनाचे समर्थन केल्यानंतर शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. शेतकऱ्यांसाठी उरलासुरला आधार संपल्याने आता काय करायचे, असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.





