बीडमध्ये सरकारी वकिलाची न्यायालयात आत्महत्या; पोलिसांनी चिठ्ठीमधील मजकूर उघड करण्यास नकार दिल्याने गूढ वाढले

बीड: बीड जिल्ह्यातील वडवणी येथील न्यायालयात सरकारी वकील व्ही.एल. चंदेल यांनी शालेच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणाने न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली असून, चंदेल यांच्या कुटुंबीयांनी या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, ही चिठ्ठी कुटुंबीयांना दाखवण्यात आलेली नाही, तसेच त्यातील मजकूर उघड करण्यास पोलिसांनी नकार दिल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. चंदेल यांच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. “चंदेल हे स्वभावाने मनमिळाऊ आणि प्रामाणिक होते. त्यांनी असे कृत्य करणे शक्य नाही. त्यांच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
गावकऱ्यांचीही सीआयडी चौकशीची मागणी –
गावातील नागरिकांनीही या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी व्हावी, तसेच चंदेल यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. याबाबत लवकरच गावकरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
पोलिसांचा तपास सुरू –
घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील न्यायालयीन वर्तुळात आणि वकिलांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
उच्चस्तरीय चौकशीची गरज-
चंदेल यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी केलेल्या मागणीमुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सरकारने याप्रकरणाची सीआयडी किंवा उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तूर्तास, पोलिसांचा तपास सुरू असून, या गूढ प्रकरणातील पुढील खुलासे काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





