Shane Warne Stake : शेन वॉर्नचा ‘मास्टरस्ट्रोक’! २० वर्षांपूर्वीच्या एका करारामुळे कुटुंबाला लागली लॉटरी; राजस्थान रॉयल्सच्या विक्रीतून मिळणार ४५८ कोटी
Shane Warne Stake : दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न याने सुमारे दोन दशकांपूर्वी घेतलेला एक दूरदृष्टीचा निर्णय आज त्याच्या कुटुंबासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरला आहे.

Shane Warne Stake in Rajasthan Royals IPL 2026 : ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न आज आपल्यात नसला तरी, आयपीएलच्या पहिल्या हंगामात त्याने दाखवलेली चतुराई आजही चर्चेत आहे. अमेरिकन उद्योजक कल सोमाणी यांनी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी सुमारे १५,२८९ कोटी रुपयांना ($१.६३ अब्ज) विकत घेतल्याने वॉर्नच्या कुटुंबाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तो का मिळणार? याबाबत जाणून घेऊया.
काय होता तो ऐतिहासिक करार?
२००८ मध्ये जेव्हा आयपीएल स्पर्धा सुरू झाली, तेव्हा राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नला कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी वॉर्नने केवळ पगारावर समाधान न मानता, फ्रँचायझीमध्ये हिस्सेदारीची (Equity) मागणी केली होती. करारानुसार, त्याला दरवर्षी सुमारे ६.५७ लाख डॉलर्स पगारासोबतच ०.७५ टक्के हिस्सा देण्यात आला. वॉर्न चार हंगाम राजस्थानकडून खेळला, ज्यामुळे त्याची एकूण हिस्सेदारी ३ टक्क्यांपर्यंत पोहोचली.
१५ हजार कोटींच्या डीलचा फायदा –
२००८ मध्ये राजस्थान रॉयल्सची किंमत केवळ ६७ दशलक्ष डॉलर्स होती, जी आज वाढून १.६३ अब्ज डॉलर्स झाली आहे. फ्रँचायझीच्या मूल्यांकनात झालेल्या या अफाट वाढीमुळे वॉर्नच्या ३ टक्के हिश्श्याची किंमत आता ४५८.६७ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएल २०२६ चा हंगाम संपल्यानंतर वॉर्नच्या कुटुंबाला हे शेअर्स विकण्याची संधी मिळू शकते, ज्यासाठी बीसीसीआयची परवानगी आवश्यक असेल.
पहिल्या जेतेपदाचा ठरला होता शिल्पकार –
शेन वॉर्नने २००८ ते २०११ या काळात राजस्थानसाठी ५५ सामन्यांत ५७ विकेट्स घेतले. त्याच्याच नेतृत्वाखाली राजस्थानने ‘अंडरडॉग’ असूनही पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावले होते. ४ मार्च २०२२ रोजी वॉर्नचे निधन झाले, मात्र त्याने लावलेले हे गुंतवणुकीचे रोपटे आज त्याच्या कुटुंबासाठी एक मोठा आधारवड ठरले आहे.





