Top 15 News: फडणवीस सरकारला झटका! सहकार मंत्र्यांवर RBIची कारवाई ते युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 7 अटींचा प्रस्ताव; जाणून घ्या TOP 15 News
Top15 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घाडामोड...

Top 15 News: 1. “मुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत उद्धवजींकडे अधिकची माहिती असेल तर त्यांनी द्यावी”
मराठवाड्याच्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू रहस्यमय असल्याचे विधान केले होते. यावर पशुसंवर्धन आणि पर्यावर्ण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “2014 मध्ये दिल्लीतील रस्ते अपघातात गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला त्याच्या वेदना आज देखील आहेत. जर उद्धवजींना वाटतं की त्यामागं कोणतं रहस्य आहे आणि त्यांच्याकडे अधिकची माहिती असेल तर त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. कोणी त्याबाबत शांत राहणार नाही. मुलगी म्हणून मी तेव्हा म्हणाले होतं की मुंडे साहेबांच्या मृत्यूची ही सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे. राजनाथजी तेव्हा गृहमंत्री होते. मुंडे साहेबांबाबत काही वेगळे झाले असे मला कुटुंब म्हणून वाटत नाही,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
2. शिंदेंच्या शिवसेनेचा नवा फॉर्म्युला! १३ तालुकाप्रमुखांसाठी नव्या कार
शिंदे गटाकडून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिंदे गटाने तयारी सुरू करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख, आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने नवीन रणनीती आखली असून यातून जिल्ह्यातील १३ तालुकाप्रमुखांना पक्षाच्या कामासाठी नव्या कोऱ्या कार देण्यात येणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीद्वारे समोर आली आहे. या नव्या गाड्या पुढारीपणा मिरवण्यासाठी नाहीतर त्याद्वारे गावागावांत पक्षाचा संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. याद्वारे तालुका प्रमुखांच्या दैनंदिन कामाचा अहवालही घेतला जाणार आहे. ‘शिवसेना आपल्या दारी’ असा संदेश देत जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
3. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता
आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, आज आणि उद्या दोन्ही दिवस राज्यातील विविध भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
4. फडणवीस सरकारला झटका! सहकार मंत्र्यांवर RBIची कारवाई
राज्याचे सहकार खाते सांभाळणाऱ्या मंत्र्यावर रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने धडक कारवाई केली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बाबासाहेब पाटील यांना थेट बडतर्फी करण्यात आले आहे. सहकार क्षेत्राचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्यावरच आरबीआयने ही कारवाई केल्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाबासाहेब पाटील हे गेल्या तब्बल १० वर्षांपासून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, सहकारी बँकांमध्ये कोणत्याही व्यक्तीला १० वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक पदावर राहता येत नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरबीआयने ही कठोर पावले उचलत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.
5. विखे पाटील-जरांगे यांच्या बंद खोलीतील चर्चेवर अजय महाराज बारस्कर यांची प्रतिक्रिया
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात रुग्णालयात बंद खोलीत झालेल्या चर्चेवर अजय महाराज बारस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीदरम्यान मोठे कंत्राट घेणारे किशोर बलांडे हे देखील उपस्थित असल्याचा दावा बारस्कर यांनी केला आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि या चर्चेचा कंत्राटाशी काही संबंध होता का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
6. ऐन गणेशोत्सवात कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, नदीचे पाणी बनलं हिरवं
ऐन गणेशोत्सवात विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीची कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. कारण सांगलीमध्ये कृष्णा नदीचे प्रदूषण इतके वाढले आहे,संपूर्ण कृष्णा नदी हिरवंगार पडला आहे.कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी हे हिरवंगार बनलं आहे.याशिवाय या पाण्याला दुर्गंधी देखील सुटली आहे.या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा गैरसोयीला समोर जावे लागते..हिरव्यागार आणि प्रदूषित पाण्यामध्ये बाप्पांचं विसर्जन कसं करायचं,म्हणून गणेश भक्तांकडून कृष्णा नदीत गणेशमूर्ती विसर्जित करण्याऐवजी महापालिकेच्या कुंडामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येत आहे. त्यामुळे कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.
7. महामेट्रोविरोधात काँग्रेसचे आंदोलन; ‘आधी रस्ता, मग मेट्रो’ची मागणी
भंडारा रोडवरील कापसी परिसरात महामेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या निषेधार्थ काँग्रेसने आज काम बंद आंदोलन छेडले. जिल्हा परिषद सदस्य माजी ढोले यांच्या नेतृत्वात नागरिकांनी रस्ता रोखून “आधी रस्त्याचे काम, मग मेट्रोचे काम” अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांच्या दैनंदिन गैरसोयी दूर करून वाहतूक व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याची मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली.
8. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महिला उमेदवाराचे नाव चर्चा
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आदिती पोहरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. आदिती पोहरे या माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयातून एम.ए. पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली आहे. दरम्यान, 6 डिसेंबर रोजी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत असल्याने येत्या काही महिन्यात अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.
9. विखे पाटील घराण्याची कन्या स्वीडनमध्ये खासदार
अहिल्यानगरमधील विखे पाटील घराण्यातील लेक नीला विखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घेतली आहे. 41 वर्षीय नीला विखे पाटील स्वीडन या उत्तर युरोपातील देशातील खासदार झाल्या आहेत. 349 सदस्य असलेल्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी नुकतीच निवडणूक जिंकली आणि त्या स्वीडनमध्ये खासदार झाल्या. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या नीला या कन्या आहेत. तर जलसंपदा मंत्री आणि मंत्रिमंडळ मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत. माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात त्यांनी वित्त, कर आणि गृहनिर्माण खात्याशी संबंधित राजकीय सल्लागार म्हणून काम केले आहे.
10. गणेशोत्सवात दुर्घटना! विजेचा शॉक लागून ८ वर्षांच्या चिमुकलीसह २ जणांचा मृत्यू
गणेशोत्सवादरम्यान एक दुैर्दवी दुर्घटना घडली आहे. लालबागमधील काळाचौकी येथील प्रसिद्ध महागणपतीच्या मंडपाजवळ रविवारी रात्री २:२० वाजताच्या सुमारा विजेचा जोरदार धक्का लागून एका ८ वर्षांच्या चिमुकलीसह २ गणेशभक्तांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशोत्सवाच्या काळात लाखोंच्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत असताना घडलेल्या या घटनेमुळे गणेशभक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ही दुर्घटना नक्की कशामुळे घडली? याबाबतची कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या घटनेचा सखोल तपास करत असून याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
11. “सिस्टीमला विद्यार्थी नको, तर अंधभक्त हवे”; राहुल गांधींचा हल्लाबोल
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंदूरमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी म्हंटले की, विद्यार्थी एखादी गोष्ट त्याला सांगितली म्हणून ते मान्य करत नाहीत. विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचं कारण समजून घ्यायचं असतं. पण सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत, विद्यार्थी प्रश्न विचारतात, ते जिज्ञासू असतात, त्यामुळं यंत्रणांना त्यांची भीती वाटते, असं राहुल गांधी म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा उल्लेख करत शाळा- महाविद्यालयांची स्थिती कशी आहे, असं विद्यार्थी विचारतात. पेपर का फुटत आहेत, तरुणांना रोजगार का मिळत नाही? विद्यार्थी अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात, यामुळं त्यांची बाजू ऐकली पाहिजे, असेही म्हंटले.
12. ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव
निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले असून, त्या निर्णयाला आव्हान देत तृणमूलच्या संस्थापिका ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी याचिका दाखल करत निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशाला आव्हान दिले. ममतांच्या याचिकेत आयोगाला आणि बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ममतांनी याआधीच तीव्र प्रतिक्रिया देताना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्यावरून निवडणूक आयोगावर टीका केली. आयोगाने दिलेल्या निर्णयाचा दिवस म्हणजे देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. अंतरिम व्यवस्था आम्ही स्वीकारणार नाही. पक्षावरील हक्क पुन्हा मिळवण्यासाठी अखेरपर्यंत राजकीय, लोकशाही आणि कायदेशीर मार्गांनी लढा देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
13. युद्ध थांबवण्यासाठी इराणने पाठवला अमेरिकेला 7 अटींचा प्रस्ताव
वाढत्या लष्करी तणावानंतर इराणने कतारच्या मध्यस्थीने 7 प्रमुख अटींचा प्रस्ताव अमेरिकेपर्यंत पोहोचवला आहे. मात्र, या अटी मान्य न झाल्यास एका निर्णायक युद्धासाठीही तेहरान पूर्णपणे तयार असल्याचा इशारा इराणने दिला आहे. राणच्या ‘सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे सचिव मोहसीन रेझाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या अटींमध्ये सर्व मोर्च्यांवरील युद्ध त्वरित थांबवणे, अमेरिकेने रोखून धरलेला इराणचा निधी तात्काळ मुक्त करणे आणि सागरी नाकेबंदी उठवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना रेझाई यांनी, इराणची भूमिका स्पष्ट असून या अटी मान्य करणे हेच अमेरिकेच्या फायद्याचे ठरेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोकळ धमक्यांना इराण भीत नाही आणि अशा धमक्यांमधून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे म्हंटले आहे.
14. विराट-रोहितची तुफान खेळी पुन्हा रंगणार
वेस्ट इंडिजचा संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. हा कॅरिबियन संघ भारतात एकूण 8 सामने खेळणार असून, त्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. बीसीसीआयने दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार आहेत. याशिवाय शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कृष्णा मोहम्मद, ब्रह्मानंद, कुलदीप, आकिब नबी दार, यशस्वी जैस्वाल आणि नमन धीर असा 15 सदस्यीय संघ असणार आहे. वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याची सुरुवात 27 सप्टेंबरपासून होणार आहे. तर अंतिम टी-20 सामना 17 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
15. ‘बिग बॉस २०’च्या घरातून पहिला स्पर्धक बाहेर?
‘बिग बॉस २०’ शोमध्ये पहिलं एलिमिनेशन पार पडणार आहे. रोहीद खानला सलमान खानच्या शोमधून बाहेर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परंतु याबाबत ‘बिग बॉस २०’च्या अधिकृत सोशल मिडिया पेजवर माहिती देण्यात आलेली नाही. आसिफ खान, स्काउट ओपी आणि रोहीद खान यांनी घरातील नियम मोडल्यामुळे त्यांना बेघर होण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रोहेद खानला घरातून बाहेर पडावं लागणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. शोमध्ये असताना रोहीदची उपस्थिती इतर स्पर्धकांच्या तुलनेत फारशी प्रभावी दिसली नाही. टास्कमध्येही त्याचा सहभाग फारसा पाहायला मिळाला नाही. त्यामुळे आता रोहीद खान ‘बिग बॉस २०’मधून बाहेर पडणारा या सीझनमधील पहिला स्पर्धक ठरला असल्याचे म्हंटले जात आहे.
हेही वाचा:
Helmet Rules: हेल्मेटसक्ती फक्त सामान्यांना? पोलिसांना नाही?








