Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल.! आता सण-उत्सवातील अन्न एफडीएच्या रडारवर; नवे आदेश काय? वाचा…
महाप्रसादाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. भारताच्या इतिहासात सर्व धर्मीयांच्या सणांसाठी वर्षभराचा असा स्थायी आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Tukaram Mundhe – राज्यात सण आणि उत्सवांच्या काळात मिळणारा महाप्रसाद, लंगर अथवा भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता एफडीएच्या रडारवर असून, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सण-उत्सवांच्या काळात होणारी अन्नातील भेसळ रोखण्यासाठी स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स हा निर्णय जाहीर केला आहे.
यानुसार, महाप्रसादाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. भारताच्या इतिहासात सर्व धर्मीयांच्या सणांसाठी वर्षभराचा असा स्थायी आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यानुसार सणांच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा आणि मटण-चिकनची मागणी अनेक पटींनी वाढते, त्यामुळे भेसळीची शक्यताही दाट असते. हे रोखण्यासाठी एफडीएने वर्षभराचे कॅलेंडर तयार केले असून सर्व सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण केले आहे.
यानुसार, कारवाईची प्रक्रिया ही सणाच्या 21 दिवस आधी सुरू होऊन सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे. ही मोहीम एकूण चार टप्प्यांत राबवली जाईल. पहिला टप्प्यात हाय-रिस्क अन्नाचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना दिली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात, गिरण्या, घाऊक मंड्या आणि वाहतुकीवर लक्ष, पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणी केली जाणार आहे. तिसर्या टप्प्यात सणाच्या दिवशी विशेष भरारी पथकांद्वारे प्रत्यक्ष ठिकाणांची सरप्राईज तपासणी केली जाणार आहे. तसेच, चौथ्या टप्प्यात दोषींवर खटले दाखल करणे आणि अहवाल आयुक्तांकडे सादर करणे यांचा समावेश आहे.
ई-कॉमर्स, आयात अन्नपदार्थ, बेकरी आणि पॅकबंद पाणी या सर्वांवर एफडीएची कडक नजर असणार आहे. झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात आहे. सण संपल्यानंतर १४ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषींवर न्यायालयात खटले दाखल केले जातील. हा स्थायी आदेश पूर्ण वर्षासाठी लागू राहणार आहे.
सर्व सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण :
१) प्रथम श्रेणी (राज्यव्यापी सण) – गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष पूर्वसंध्या.
२) द्वितीय श्रेणी (प्रादेशिक सण) – मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.
३) तृतीय श्रेणी (स्थानिक सण ) – जत्रा, पालखी सोहळा आणि उरुस.






