Ujjwal Nikam : ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढणार कल्याणचा खटला

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातही ठाणे जिल्ह्यात अशा घटना सर्वाधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी बदलापुरातील एका शाळेत तीन ते चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. ज्यानंतर या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काऊंटर केले.
या घटनेचे पडसाद कमी होत नाही तेच आता कल्याण येथे एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हृहय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल गवळी हा पोलीस कोठडीत आहे. परंतु, या प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे या खटल्याची बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, याची सुनिश्चिती करा, असे आदेश दिले आहेत.
त्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु, आता गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी मोठे पाऊल उचलत हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवला आहे.





