#BiharWACT2024 | भारतीय पोरींची कमाल..! तिसऱ्यांदा Asian Champions Trophy वर कोरलं नाव, ऑलिम्पिक पदकविजेत्या चीनचा उडवला धुव्वा….

Women’s Asian Champions Trophy 2024 (India vs China, Final) : महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताकडून सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने 31व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरव्दारे केला. स्ट्रायकर दीपिकाने स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करताना तब्बल 11 गोल करताना मालिकावीर हा ‘किताब पटकावला.
🏆 Champions Again! 🇮🇳🔥
Team India clinches the Bihar Women’s Asian Champions Trophy Rajgir 2024 title with a stellar 1-0 victory over China! 🎉💪 The defending champions have shown their grit, skill, and determination, proving once again why they are on top of Asia.
Another… pic.twitter.com/RkCxRI2Pr2
— Hockey India (@TheHockeyIndia) November 20, 2024
भारत आणि चीन यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलशून्य राहिले, म्हणजेच हाफ टाईमपर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. पूर्वार्धात भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, तर चीनला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्याचा फायदा उठवण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले. यानंतर तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला दीपिकाला गोल करण्यात यश आले.
या स्पर्धेपूर्वीच सलीमा टेटे हिला भारतीय संघाची कर्णधार बनवण्यात आले होते आणि तिच्या पहिल्याच मोठ्या स्पर्धेमध्ये तिने टीम इंडियाला चॅम्पियन बनवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चीनने शेवटच्या क्षणापर्यंत गोल करण्याचा अथक प्रयत्न केला. त्यांनी शेवटच्या क्षणी मैदानावरील गोलकीपरला 11व्या खेळाडूसह सब्स्टिट्यूट केलं. असे असूनही चीनच्या संघाला एकही गोल करता आला नाही.
स्पर्धेत भारत अंजिक्यच….
या सामन्यापूर्वी चीनचा संघ भारतीय संघापेक्षा हेड टू हेड आकडेवारीत खूप पुढे होता. मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व राखले. भारतीयांनी या सामन्यात आपले सर्व सामने जिंकून विजेतेपदावर कब्जा केला. फायनलमध्ये पोहोचेपर्यंत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नव्हता. साखळी फेरीतील पाचही सामने जिंकून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर होती. भारतीय संघाने उपांत्य फेरीत जपानविरुद्ध 3-0 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याआधी ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने एकूण 26 गोल केले होते, तर त्यांच्याविरुद्ध फक्त 2 गोल झाले होते.
भारत तिसऱ्यांदा झाला चॅम्पियन…
भारताने यापूर्वी दोनदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. 2016 मध्ये टीम इंडियाने एका रोमांचक सामन्यात चीनचा 2-1 असा पराभव केला होता. 2023 मध्ये, भारतीय संघाने विजेतेपदाच्या सामन्यात जपानचा 4-0 असा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. गेल्या पाच स्पर्धेत भारताने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे, तर दुसरीकडे चीनने इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती, मात्र यावेळीही निराशा झाली. भारताचा हा विजय सुद्धा संस्मरणीय आहे कारण त्याने एकही सामना न गमावता स्पर्धेत विजेतेपद पटकावले.





