नवी दिल्ली : भारताने शनिवारी आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत हा सामना 2-1 ने जिंकला. हा सामना चीनमधील हुलुनबुइर येथील मोकी हॉकी ट्रेनिंग बेसवर खेळवण्यात आला होता. या विजयासह भारताने या टूर्नामेंटमध्ये पाचव्या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह भारताने सर्व 5 सामन्यांमध्ये विजय मिळवून पहिलं स्थान प्राप्त केलं आहे, तर पाकिस्तान 5 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघानी सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
कसा झाला सामना?
सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या अहमद नदीमने 7 व्या मिनिटाला गोल करत टीमला 1-0 अशी आघाडी दिली. शाहीनने गोल डीडीमध्ये ठेवला होता आणि नदीमने त्याला डिफ्लेक्ट करून गोल केला. यानंतर, भारताने 13 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये बदलून 1-1 ने बरोबरी केली. हरमनप्रीत सिंहने गोल पोस्टच्या राइट कॉर्नरवर ड्रॅग फ्लिक करून गोल केला.दुसऱ्या क्वार्टरच्या 19 व्या मिनिटाला भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोल पोस्टच्या सेंटरमध्ये शॉट मारून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली आणि भारताचा विजय झाला.
या विजयासोबत भारताने पाकिस्तानवर 8 व्या विजयाची नोंद केली आहे. हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 12 वा सामना होता. 12 सामन्यांपैकी 2 सामने पाकिस्ताने जिंकले आहेत तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. टूर्नामेंटमधील सेमीफायनल 16 सप्टेंबरला खेळली जाईल, तर फाइनल 17 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.