Asian Table Tennis C’ships 2024 : मनिका बत्रा अन् टीमने रचला इतिहास, भारताला पहिल्यांदाच मिळणार पदक…

Asian Table Tennis C’ships 2024 (India vs Korea) : कझाकस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या 2024 आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यासह भारताने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील पहिले पदक निश्चित केलं आहे.
एकवेळ भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर होता, मात्र दक्षिण कोरियाने शानदार पुनरागमन करत सामना रोमांचक बनवला. आयका मुखर्जी आणि मनिका बत्रा यांनी आपापले गेम जिंकून टीम इंडियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. एकीकडे मुखर्जीने शिन युबीचा 11-9, 7-11, 12-10, 7-11, 11-7 असा पराभव केला. दुसरीकडे, मनिका बत्राने जिओन जिहीचा 12-11, 13-11, 11-5, 5-11, 12-10 असा रोमांचकारी पराभव केला.
The Indian women’s team has assured its first-ever medal at the Asian Table Tennis Championships! 🔥
India reached the semifinals of the Asian Table Tennis Championships 2024 after defeating Paris 2024 bronze medallists the Republic of Korea 3-2! 👏@ttfitweet pic.twitter.com/LgUqOFYO7u
— Olympic Khel (@OlympicKhel) October 8, 2024
पण यानंतर श्रीका अकुलाला तिच्या गेममध्ये 0-3 असा दणदणीत पराभव पत्करावा लागला, तर दुसरीकडे अतितटीच्या सामन्यामध्ये मनिकाला शिन युबीकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागला. या फेरीतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात सर्वांच्या नजरा आयिका मुखर्जी आणि जिओन जीही यांच्यातील लढतीकडे लागल्या होत्या. भारत-दक्षिण कोरिया 2-2 ने बरोबरीत होते आणि या दबावाच्या परिस्थितीत मुखर्जीने जिओनचा 3-0 असा पराभव करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारतानं पदक केले निश्चित…
आशियाई टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून भारतीय संघाचे किमान कांस्य पदक निश्चित झाले आहे. आता बुधवारी उपांत्य फेरीत भारताचा सामना जपान किंवा सिंगापूर यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
गतवर्षीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय महिला संघ आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत सहाव्या स्थानावर राहिला होता. त्यावेळी 5व्या आणि 6व्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात थायलंडकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र अवघ्या वर्षभरानंतर भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. भारतीय पुरुष संघानेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.





