Hockey | राष्ट्रीय शिबिरासाठी 65 हॉकीपटूंची निवड

बेंगळुरू – भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात (साई) दि. 14 ते 25 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय शिबिर पार पडणार आहे. या शिबिरासाठी हॉकी इंडियाने शनिवारी 65 हॉकीपटूंची निवड जाहीर केली आहे.
भुवनेश्वर येथे झालेल्या शेवटच्या एफआयएच कनिष्ठ पुरुष विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघासाठी 2022 मधील आगामी स्पर्धांसाठी 33 प्रमुख संभाव्य खेळाडूंची यादी निवडण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले आहे.
राष्ट्रीय शिबिराचे महत्त्व अधोरेखित करताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले, आगामी स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आम्ही आगामी स्पर्धांसाठी संपूर्ण तयारी करत उतरू इच्छितो. तसेच प्रत्येक स्पर्धेसाठी आमचा सर्वोत्तम संघ पाठवणे हेच आमचे ध्येय आहे. याशिवाय तरुण खेळाडूंसाठी ही एक संधी असल्याचे त्यांनी सांगितले.





