Harmanpreet Singh : ‘विश्वचषक पदकाचे पाच दशकांचे स्वप्न अपूर्ण’ – हरमनप्रीत सिंग

Harmanpreet Singh : भारतीय हॉकी संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत केवळ तीन पदके मिळविली आहेत. यामध्ये १ सुवर्ण, १ रौप्य व एक कांस्य पदकाचा समावेश आहे. भारताने १९७१ मध्ये कांस्य, १९७३ मध्ये रौप्य तर १९७५ मध्ये अजित पालच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक जिंकले होते. १९७५ नंतर पुन्हा भारताला विश्वचषक स्पर्धेत कोणतेही पदक मिळविता आले नव्हते. गेल्या ५ दशकांपासून हॉकी विश्वचषक स्पर्धेत असणारे भारताचे अपयश पुसून काढायचे असल्याचे भारताचा कर्णधार असलेल्या हरमनप्रीत सिंगने बोलताना सांगितले.
भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार असलेला हरमनप्रीत सिंगने दोन ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला असून त्यावेळी भारताने पदके जिंकली आहेत. या दोन्ही पादकांमुळे भारतीय संघाचा विश्वास दुणावला आहे. पुढील वर्षी हॉकीचा विश्वकरंडक होणार असून या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हरमनप्रीत म्हणाला.
पीटीआयशी बोलताना हरमनप्रीत म्हणाला, आमचे ध्येय नेहमीच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि विश्वचषक स्पर्धेत पदक जिंकण्याचे असेल. आम्ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यावरून आम्ही कोणत्याही अव्वल संघाचा सामना करू शकतो आणि जिंकू शकतो हे स्पष्ट होते. तो पुढे म्हणाला, एफआयएच प्रो लीग सामने हे आमचे तात्काळ लक्ष्य आहे. आशिया चषक जिंकून आम्हाला थेट विश्वचषकासाठी पात्र ठरायचे आहे. आम्ही बऱ्याच काळापासून विश्वचषक स्पर्धेत पदक जिंकले नाही आणि मला माझ्या कारकिर्दीत ते भारताला जिंकून द्यायचे आहे.
तोपर्यंत हार मानणार नाही…
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. एकेकाळी हॉकीला सुवर्ण दिवस होते. मात्र मधल्या काळात हॉकीकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आम्हाला आशा आहे की, आम्ही आमच्या कारकिर्दीत ते सुवर्ण दिवस पुन्हा जगू शकू. हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देईपर्यंत हार मानणार नसल्याचे कर्णधार हरमनप्रीतने बोलताना सांगितले.
ड्रॅग-फ्लिकची कौशल्ये सुधारणार
जगातील दर्जेदार ड्रॅग-फ्लिकर म्हणून हरमनप्रीत सिंगकडे पाहिले जाते. मात्र, ही त्याच्याकडे असलेली कौशल्यामध्ये अजून सुधारणा करण्यास वाव असल्याचे त्याने सांगितले. याचबरोबरीने त्याने कारकीर्द लांबविण्यासाठी तंदुरुस्त राहणार असल्याचे देखील सांगितले. यासाठी त्याने सरावात सातत्य ठेवले असल्याचे देखील तो म्हणाला.





