Commonwealth Games 2026 : भारतीय क्रीडा जगताला मोठा धक्का..! क्रिकेट-हॉकीसह अनेक खेळांना राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळलं…

Commonwealth Games 2026 :- जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ग्लासगो राष्ट्रकुल खेळांमधून यजमान ग्लासगो शहराने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट व नेमबाजी या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला असून यामुळे स्पर्धेतील भारताच्या पदक जिंकण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. याचबरोबरीने टेबलटेनिस, स्क्वॅश व ट्रायथलॉन या खेळांचा देखील समावेश करण्यात आलेला नाही.
बर्मिंगहॅममध्ये 2022 साली राष्ट्रकुल खेळांमध्ये या नऊ खेळांचा समावेश करण्यात आला होता. मात्र आगामी ग्रासगो राष्ट्रकुल खेळांमधून हे खेळ वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 23 जुलै ते 22 ऑगस्ट 2026 दरम्यान ग्लासगो येथे स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर ख्रिास हॉय वेलोड्रोम, स्कॉटस्टॉन स्टेडियम, टोलक्रॉस आंतरराष्ट्रीय जलतरण संकुल आणि स्कॉटिश इव्हेंट्स कॅम्पस अशा केवळ चारच केंद्रांवर होणार आहे. खर्च कमी करण्यासाठी आणि संचालनसंबंधी जोखीम टाळण्यासाठी, खेळ फक्त चार ठिकाणी आयोजित केले गेले आहेत. ग्लासगो शहराने 2014 मध्ये यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते.
Hockey, shooting, cricket, badminton, wrestling among major sports dropped from #CommonwealthGames2026
The 2026 Commonwealth Games will be held across four venues in Glasgow, Scotland, from July 23 to August 2. Table Tennis and squash are also out pic.twitter.com/GMpexcerxt
— DD News (@DDNewslive) October 22, 2024
गतवेळी 19 खेळ राष्ट्रकुल स्पर्धेत घेण्यात आले होते. मात्र 9 खेळ वगळल्याने केवळ 10 खेळ यावेळी घेण्यात येणार आहेत. यामध्ये ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड), पोहणे आणि पॅरा स्विमिंग, कलात्मक जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो, बोल्स यांचा समावेश आहे.
यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी करताना चौथे स्थान मिळविले होते. भारताने वगळण्यात आलेल्या खेळामधूनच बहुतांश पदके मिळविली होती. वगळण्यात आलेल्या अनेक खेळांमध्ये भारत पदकाचा प्रबळ दावेदार होता आणि त्या खेळांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. भारताने 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 16 खेळांमध्ये 210 खेळाडूंना मैदानात उतरवले होते. भारतानं या खेळांमध्ये 61 पदके जिंकली होती, ज्यात 30 पदके अशी होती, जी यंदाच्या राष्ट्रकुल खेळांच्या कार्यक्रमातून काढून टाकण्यात आलेल्या खेळात खेळाडूंनी जिंकली होती.





