मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत घोटाळा? गट ‘अ’चा पेपर फुटल्याचा आरोप

मुंबई : बीएमसीच्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या परीक्षेचा पेपर फुटला असून एक-एक प्रश्न 10 लाखांना विकला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचले आहे. राज ठाकरे लवकरच या संबंधित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या गट अ खात्यात नियुक्तीसाठी 25 फेब्रुवारी रोजी परीक्षा पार पडली. ही परीक्षा आयबीपीएसमार्फत घेण्यात आली होती. परंतु, 19 फेब्रुवारी रोजी या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. परीक्षेत कोणते प्रश्न येणार यासंदर्भातील माहिती पुरवल्याचा आरोप 500 हून अधिक अभियंत्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांशी बोलणार
एकदा हे पैसे देऊन इंजिनियर झाले, की नंतर हे पैसे खाण्याचेच काम करतील. यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. राज ठाकरे यांना आम्ही पूर्ण प्रकाराची कल्पना दिलेली आहे. लवकरच राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन त्या विषयावरती बोलणार आहेत, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.





