China Masters 2023 : भारताच्या सात्विक-चिरागची अंतिम फेरीत धडक

China Masters 2023 badminton tournament in Shenzhen :- भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत जी टिंग आणि रेन जियांग यू या चिनी जोडीचा 21-15,22-20 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह सात्विक-चिराग या जोडीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
अंतिम फेरीत सात्विक आणि चिराग यांचा दुसऱ्या उपांत्य सामन्यातील चेन बो यांग आणि लिऊ यी आणि द्वितीय मानांकित लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्यातील विजेत्याशी होईल.
सात्विक-चिरागसाठी यंदाचे वर्ष छान राहिले आहे. या जोडीने यावर्षी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप, इंडोनेशिया सुपर 1000, कोरिया सुपर 500, स्विस सुपर 300 आणि आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
दरम्यान, BWF सुपर 750 इव्हेंट चायना मास्टर्स 2023 मधील निकाल पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी खेळाडूंच्या पात्रता क्रमवारीत मोजले जातील. बॅडमिंटनसाठी पात्रता विंडो या वर्षी 1 मे रोजी सुरू झाली आणि एप्रिल 2024 मध्ये संपेल.





