Thailand Open 2024 : सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत…

Thailand Open 2024 (बँकाँक) – भारताच्या पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना थायलंड ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. सात्विक-चिराग व्यतिरिक्त भारताचा युवा खेळाडू मैराबा लुवांग मैस्नाम देखील अंतिम-16 मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला.
सात्विक आणि चिरागने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात 69व्या क्रमांकाच्या शे साओ नान आणि झेंग वेई हान यांचा 21-16, 21-11 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय जोडीचा पुढील फेरीत सामना मलेशियन जोडी जुनैदी आरिफ आणि रॉय किंग यापशी होणार आहे.
पहिल्या फेरीत देशबांधव एच.एस. प्रणॉयला हरविल्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ वर्षीय मैराबाने ५० मिनिटे चाललेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत डेन्मार्कच्या मॅड्स क्रिस्टोफरसनचा २१-१४, २२-२० असा पराभव केला. मायराबाला पुढील फेरीत विश्वविजेता आणि स्थानिक स्पर्धक कुनलावुत वितिदसर्नचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. तर दुसरीकडे, महिला एकेरी गटात अश्मिता चालिगाला चीनच्या हान यूविरुद्ध १५-२१, २१-१२, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.





