China Masters 2024 : ‘सात्विक-चिराग’ला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…

China Masters 2024 (Satwiksairaj & Chirag) : भारताची आघाडीची दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना शनिवारी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. यासह चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.
भारतीय जोडीला कोरियाच्या ‘जिन योंग’ आणि ‘सेओ सेउंग जे’ जोडीने तीन गेममध्ये पराभूत केले. पॅरिस ऑलिम्पिकनंतरच्या पहिल्याच स्पर्धेत भाग घेणारी भारतीय जोडी स्पर्धेच्या मागील आवृत्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय जोडीला 74 मिनिटे चाललेल्या सामन्यात दबाव कायम ठेवता आला नाही आणि बिगरमानांकित कोरियन जोडीकडून 21-18, 14-21, 21-16 असा पराभव पत्करावा लागला.
सुरुवातीच्या गेममध्ये चुरशीची स्पर्धा झाली आणि दोन्ही जोडींनी जोरदार खेळ केला. मात्र डावखुऱ्या कोरियन जोडीने आघाडी घेत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने आपली ऊर्जा कायम राखत 15-10 अशी आघाडी घेतली. त्यानंतर नेटवर कोरियन जोडीच्या चुकांचा फायदा घेत त्यांनी दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली.
China Masters 2024 : सात्विक-चिरागचा विजयी धडाका कायम, स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मारली धडक….
निर्णायक गेममध्ये कोरियन जोडी ब्रेकपर्यंत 11-7 ने आघाडीवर होती. भारतीय जोडीने 7-13 अशा पिछाडीवरून जोरदार पुनरागमन केले आणि पुढील सातपैकी सहा गुण जिंकून गुणसंख्या 13-14 वर नेली. त्यानंतर भारतीयांनी दबाव कायम ठेवला आणि 15-16 अशी गुणसंख्या नेली. पण कोरियन संघाने जोरदार पुनरागमन करत 18-15 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर सामना जिंकला.





